अर्ज भरण्यासाठी उरले फक्त दोन दिवस!पुसद विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी महाविकास आघाडीत तिढा कायम..
मतदार संघातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी संभ्रमात!

पुसद: विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक पण अद्याप पुसद विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी महाविकास आघाडीने आपला उमेदवार घोषित न केल्याने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी संर्भमात आहेत. या मतदारसंघात एकीकडे महायुतीने इंद्रनील मनोरराव नाईक यांना तिकीट जाहीर केले असून त्यांना एबी फॉर्म सुद्धा देण्यात आला आहे.तर इंद्रनील नाईक यांचे वडील माजी मंत्री मनोराव नाईक यांनी पुसद मतदारसंघातील संपूर्ण जिल्हा परिषद व पंचायत समिती सर्कल मधील कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या भेटीगाठी घेऊन बैठकाही पार पडल्या असून इंद्रनील नाईक दि.२८ ऑक्टोंबर रोजी माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दुसरीकडे २९ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. मात्र अद्यापही महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर झाला नसल्याने मतदार संघातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी चिंतेत असून ही जागा महाविकास आघाडीच्या कोणत्या उमेदवाराला जाहीर होणार याची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे.आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कधी नव्हे ती यावेळेस प्रचंड उत्सुकता व स्पर्धा निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. इच्छुकांनी महाविकास आघाडीचे घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडे उमेदवारी मागितली असुन गेल्या आठ नऊ दिवसापासून ठिय्या मांडून बसले आहे. या यवतमाळ- वाशिम लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने या मतदारसंघात चांगला परफॉर्मन्स दाखविला होता.महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उमेदवार संजय देशमुख हे चांगल्या मताधिक्यने विजयी झाले होते. राज्यातही महाविकास आघाडीने चांगला परफॉर्मन्स ठेवला होता. यामुळेच महाविकास आघाडी कडून पुसद विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी मिळावीण्या करिता इच्छुकांनी महाविकास आघाडीचे घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडे उमेदवारी मागितली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पुसद अर्बन कॉपरेटिव ऑफ बँकेचे अध्यक्ष शरद मैंद, राष्ट्रवादी शरद पवार गटाची लीगल सेलचे अध्यक्ष ॲड .आशिष देशमुख, युवा नेते ययाती नाईक, आदिवासी समाजाचे नेते माजी समाज कल्याण अधिकारी, माधवराव वैद्य यांनी सिल्वर ओक वर जाऊन ठीया दिला आहे मात्र २८ तारीख उजाडली तरीही महाविकास आघाडीचा उमेदवार पुसद विधानसभा मतदारसंघासाठी अधिकृतपणे जाहीर झालेला नसल्याने महायुतीच्या उमेदवारास संपूर्ण रान मोकळे झाले असून त्यांचा हौसला वाढला आहे. महाविकास आघाडीचा पुसद विधानसभे बाबत तिढा कायम असल्याने उमेदवार कोण? असा संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यामुळे अगोदरच या उमेदवारांना प्रचाराकरिता कमी अवधी मिळणार आहे.पुसद येथील नाईक घराण्याचे महाराष्ट्राच्या राजकारणात अनन्यसाधारण महत्त्व आहे. राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणानंतर नाईक बंगल्यातच उमेदवारीसाठी रस्सीखेच बघायला मिळणार होती “थोरले की धाकटे”असा पेच नाईक कुटुंबात निर्माण झाल्याची चर्चा असल्याने या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत होणार असे संकेत असताना सुद्धा महाविकास आघाडी कडून तिकीट न जाहीर झाल्याने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहे.



