चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन, दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राचे ड्याशिंग खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांनी आज पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास अखेरचा श्र्वास घेतला असून वयाच्या ४७ व्या वर्षी त्यांचे आजाराने निधन झाले. दिल्लीच्या गुरुग्राम येथील वेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर दोन दिवसापासून उपचार सुरु होते. वडिलांच्या निधनानंतर शनिवार २७ मे रोजी त्यांची तब्येत बिघडली होती. त्यांना नागपुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या आतड्यात इन्फेक्शन झाले असता, त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी नागपूरहून दिल्लीला विशेष एअर अॅम्बुलन्सने विमान सेवेने नेण्यात आले होते.दिल्लीच्या वेदान्ता हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तज्ञ डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरु केले असून ते लवकरच बरे होणार असल्याची माहिती जनसंपर्क कार्यालयामार्फत देण्यात आली होती. बाळू धानोरकर यांना जीवनरक्षक प्रणाली ( व्हेंटिलेटर) वर ठेवण्यात आले होते. मात्र रविवारी मध्यरात्री दरम्यान त्यांची प्रकृती आणखी खालावली होती. दरम्यान आज मंगळवारी पहाटे साडेतीन वाजेदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज ३० मे रोजी दुपारी २ वाजेपासून ३१ मे २०२३ सकाळी १० वाजेपर्यंत वरोरा येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी पार्थिवदेह ठेवण्यात येणार आहे. बुधवार दि. ३१ मे रोजी वणी – वरोरा बायपास मार्ग येथील मोक्षधाम येथे सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येईल. अल्पवयात झालेल्या दुःखद निधनाने संपूर्ण लोकसभा क्षेत्रात शोककळा पसरली आहे.