पाच हजार पेक्षा अधिक युवकांना मिळणार नामवंत कंपन्यात रोजगार, भव्य रोजगार महोत्सव!

वणी/प्रतिनिधी( शुभम कडू ) : वणी विधानसभा मतदारसंघातील शिक्षित आणि कुशल युवक-युवतींना यशस्वी करिअर सुरू करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने मनसे पक्ष नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून भव्य रोजगार महोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. देशातील ८० पेक्षा अधिक उद्योग, सेवा आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील नामवंत कंपन्या या रोजगार महोत्सवात सहभागी होणार आहे.
पाच हजारांपेक्षा अधिक पदांसाठी थेट मुलाखती घेतल्या जाणार असून, पात्र उमेदवारांना तत्काळ नियुक्ती पत्र दिले जाणार असून वणी विधानसभा क्षेत्रातील युवकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर रोजगार मेळावा संपूर्ण जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार आहे, असे मनसे नेते राजू उंबरकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर नोंदणी करून सहभाग घ्यावा, असे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये वणी विधानसभा क्षेत्रातील युवकांकरिता संधी उपलब्ध झालेली असून, सद्गुरू श्री जगन्नाथ महाराज भांदेवाडा येथे नारळ फोडून २१ सप्टेंबरपासून फॉर्म भरण्याला सुरुवात होनार आहे. त्यानंतर उमेदवारांकरिता मुलाखत पूर्व प्रशिक्षणाची सुद्धा सुरुवात होणार आहे. वणी, मारेगाव व झरी या तिन्ही तालुक्यांमध्ये मुलाखत पूर्व प्रशिक्षण पार पाडल्यानंतर ३ डिसेंबरला रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात उमेदवारांना मुलाखत आणि लगेच नियुक्तीपत्र प्रदान करून देशातील नामवंत कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी मनसेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. उमेदवारांना ऑफलाइन व ऑनलाईन दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येणार आहे. क्यूआर कोडद्वारा उमेदवारांना संपूर्ण नोंदणी फॉर्म भरता येणार आहे व रजिस्ट्रेशन लिंकवरून रोजगार मेळाव्यासंदर्भात माहिती प्राप्त होणार आहे. युवकांना मुलाखतीमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी मुलाखत पूर्व प्रशिक्षणाची आवश्यकता असते. त्यामध्ये मुलाखतीचे बारकावे, फॉर्मसंदर्भात आवश्यक माहिती, तसेच रोजगार मेळाव्यातील संपूर्ण मार्गदर्शन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चमूद्वारा वणी, मारेगाव व झरी या तिन्ही तालुक्यांतील ५० हून अधिक मुख्य गावात वेळापत्रकानुसार पार पाडण्यात येणार आहे.



