शाळकरी विद्यार्थीची बस फेरी चालू करण्याच्या संदर्भात थेट राजू उंबरकर यांची भेट

वणी/प्रतिनिधी( शुभम कडू ) : तालुक्यातील महाकालपूर येथील मुले, मुली शहरातील जनता महाविद्यालयात शिक्षणासाठी येतात. यामध्ये वर्ग ८,९ व १० मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी असून हे सर्व विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेत येण्यासाठी एस. टी. बंद असल्यामुळे शाळेत येण्यासाठी पर्यायाने खाजगी वाहनाने यावे लागते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोज खासगी वाहनाने प्रवास करणे शक्य नसून आर्थिकदृष्ट्या परवडू शकत नसल्याने रोज शाळेत येणे शक्य होत नाही. या समस्येबाबत विद्यार्थांनी राजू उंबरकरांची कार्यालयात भेट घेऊन त्यांच्या समस्येचं निराकरण करावं अशी विनंती केली. विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय बघता राजू उंबरकरांनी त्वरित महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळाच्या वणी आगार व्यवस्थापकास फोन वरून चर्चा केली. वणी – महांकालपूर बस फेरी त्वरित चालु करुन दिली. विद्यार्थांनी राजू उंबरकरांचे आभार मानले.



