स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळचे पथक ॲक्शन मुडमध्ये; वसंत नगर ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या धारदार गुप्ती शस्त्र बाळगल्याप्रकरणी एका आरोपीस अटक!

पुसद : शहरातील वसंत नगर ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींची माहिती काढून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाईच्या सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक यवतमाळ यांनी दिल्याने स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाने वसंत नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका इसमाकडुन धारदार एक गुप्ती जप्त करून आरोपीस अटक केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पथकाच्या पोलिसांनी गुरुवारी (ता.२५) रोजी केली आहे.
याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहराची शांतता भंग करणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांची आता करडी नजर राहणार आहे. जिल्ह्यातील शहरात अवैधरित्या शस्त्र बाळगणार्या गुन्हेगारांची संख्या वाढत आहे. सर्वसाधारण वाद होताच थेट शस्त्रांचा वापर केल्या जात आहे. त्यामुळे शहराच्या शांततेला गालबोट लागत आहे. यात विशेष करुन बालगुन्हेगार सर्सास घातक शस्त्रांचा वापर करीत आहेत. व ही शस्त्र शहरात सहज मिळत आहेत. त्यावर अंकुश बसावा व शहराची शांतता बाधीत होणार नाही याची दक्षता घेवून गुन्हेगारीवर नियंत्रण तसेच अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील संबंधीत ठाण्याच्या हद्दीतील पोलीसांनी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने घ्यावी अशा कडक सुचना जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता (भा.पो.से.)यांनी दिल्या आहेत. त्या आदेशा वरून दि, २५ सप्टेंबर २०२५ रोजी पुसद उपविभागात गस्त घालत असताना वसंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिर्झा चिकन सेंटर परिसरात संशयित इसम मिर्झा मुसरान बेग मिर्झा मोबीन बेग (वय ३०, रा. गढीवार्ड, पुसद, जि. यवतमाळ) हा सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था भंग करण्याच्या उद्देशाने धारदार गुप्ती बाळगून असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यावेळी पोलिसांनी सापळा रचून दोन पंचाच्या उपस्थितीत संशयित इसमाची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून गोलाकार लोखंडी पाईपमध्ये बसवलेली धारदार गुप्ती आढळून आली. सदर शस्त्र ताब्यात घेऊन आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील कारवाईसाठी त्यास वसंतनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बी.जे., तसेच पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पार पाडली आहे.या कारवाईत सपोनि/धिरज बांडे, पोउपनि/शरद लोहकरे, सफौ/मुन्ना आडे, पोहवा/संतोष भोरगे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा/कुणाल मुंडोकार, पोहवा/रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि/रविंद्र शिरामे, पोशि/राजेश जाधव (स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ) यांनी विशेष योगदान दिले. सध्या दुर्गा उत्सव सुरू असल्याने पोलिसांनी अवैध शस्त्रांवर धडक कारवाई केल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केल्या जात आहे.