वाई (मेंढी) ते कलगाव रस्त्यांचे काम रखडल्याने ग्रामस्थाचा पुसद सा.बां.विभागापुढे संविधानाची प्रत खुर्चीवर ठेवून ठिय्या आंदोलन!

पुसद : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रातील दिग्रस तालुक्यातील वाई मेंढी ते कलगाव या मुख्य रस्त्याचे काम संबंधित कंत्राटदारास काम मंजूर आहे. तरीही बांधकाम में. चिद्दरवार कंट्रक्शन कंपनी लि. पुसद यांनी मागील बारा महिन्यापासून वेळकाढूपणा करुन रखडत ठेवल्याने हा रस्त्यांचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय समोर ग्रामस्थांनी संविधानाची प्रत खुर्चीवर ठेवून ठिय्या आंदोलन केले आहे. 
याबाबत प्राप्त माहिती अशी की, पुसद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर कार्यकारी अभियंता तसेच उपविभागीय अभियंता यांच्या समक्ष कंत्राटदाराला बोलावून आज दि.३१ ऑक्टोंबर रोजी वाई मेंढी ते कलगाव या मुख्य रस्त्याचे काम तात्काळ सुरू करून कंत्राकदाराला काळ्या यादीत टाकण्यासाठी गावातील ग्रामस्थांकडून संविधानाची प्रत खुर्चीवर ठेवून ठिय्या आंदोलन करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदाराला वाई मेंढी ते कलगाव या रस्त्याच्या कामासाठी कोटींचा निधी मंजूर झाला आहे. परंतु मागील बारा महिन्या पासून या रस्त्यावर मोठा गीट्टा( ४० एम एम) अंथरून ठेवून काम सबंधित कंत्राटदराने जाणीवपूर्वक अपूर्ण अवस्थेत ठेवले आहे.त्यामुळे या मार्गावरील गावांच्या ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. गावातील ग्रामस्थांना व आजारी असलेल्या वृध्दांना तसेच गर्भवती माता भगिनींना व रुग्णांना या रस्त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी रस्ता खराब असल्यामुळे नाहकत्रास सहन करावा लागत आहे तर एकीकडे खराब रस्त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतातील ऊसाचे पीक तोडणीला आले असताना कारखानदार तोडणी करण्यास मनाई करत आहे त्यामुळे शेतकरी सुद्धा या अपूर्ण असलेल्या रस्त्यामुळे अडचणीत आला आहे. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांचे जीवनमान धोक्यात आल्याने तसेच संबंधित कंत्राटदाराने जाणीवपूर्वक हा रस्ता अर्धवट ठेवल्यामुळे या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून तात्काळ कारवाई करावी तसेच ह्या रखडलेल्या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी वाई मेंढी येथील सरपंच, उपसरपंच यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या उपस्थितीत पुसदच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयासमोर खुर्चीवर संविधानाची प्रत ठेवून ठिय्या आंदोलन केले आहे.
यावेळी पुसद सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेश माथुरकर, उपविभागीय अभियंता उमांकात कांबळे, कंत्राटदार जयंत चिद्दरवार यांच्या उपस्थितीत उपविभागीय अभियंता यांनी रस्त्याचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन तात्पुरते ग्रामस्थानी स्थगित केले आहे.यावेळी वाई(मेंढी) येथील समस्त ग्रामस्थ सरपंच हरीओम गायमुखे, उपसरपंच शरद परंडे, राहुल राऊत, कालिदास मोरे, सुदाम इंगोले, प्रल्हाद चोपडे, रामेश्वर डवले, बबन इंगोले, गणेश मोरे, नरेंद्र पाईकराव, विश्वनाथ भापले, शंकर डवले, ज्ञानेश्वर वानखेडे, रामराव ढोक, उमेश वाघ, रामकृष्ण पांडे, ज्ञानेश्वर भिसे आदी नागरिक उपस्थित होते.



