जगणं सुंदर करावं ते शिवरायांसारखं-प्रा.डाॅ.अपर्णा पाटील ;सुधाकरराव नाईक स्मृती व्याख्यान पुष्प!

पुसद : जीवन सुंदर करण सोप आहे पण ते जगाला दाखवणे किंवा तसा आभास निर्माण करणे खूप कठीण आहे जगाच्या नकाशात तुमची गाडी, घोडा, बंगला काहीच दिसत नाही दिसते ते फक्त तुमचे काम आपलं जगणं सर्वांग सुंदर करायचे असेल तर आपल्या भावनांचा रिमोट आपल्या हातात असला पाहिजे. जगणं सुंदर करावं ते छत्रपती शिवरायांसारखं असे मौलिक उद्गार दिग्रस येथील प्रा डॉ अपर्णा पाटील यांनी काढले.
त्या श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद व विदर्भ साहित्य संघ स्थानीय शाखा पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, भूमिपुत्र ,रसिकराज सुधाकरराव नाईक यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानपुष्पात ‘जगणं सुंदर आहे’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होत्या. याप्रसंगी माजी मंत्री डॉ एन पी हिराणी, कृषिभूषण दीपक आसेगावकर ,माजी आमदार विजयराव पाटील चोंढीकर, ऍड. आशिष भाऊ देशमुख , डाॅ.उत्तमराव रुद्रवार ,डाॅ.अभय पाटील यासह प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डाॅ.अपर्णा पाटील दिग्रस हे विचार पिठावर उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते देवी सरस्वती ,छत्रपती शिवाजी महाराज ,लोकनेते देवराव पाटील चोंढीकर, सुधाकर नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सारंग कोरटकर व महेंद्र अंबुरे यांनी सरस्वती स्तवन सादर केले. त्यानंतर प्रमुख वक्ते प्रा अपर्णा पाटील यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या सचिव अश्विनीताई अनिरुद्ध पाटील चोंढीकर यांनी सत्कार केला, सोबतच डॉ अभय पाटील यांचा सत्कार श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंढीकर यांनी केला. व्याख्यान पुष्पाचे प्रास्ताविक व प्रमुख वक्त्यांचा परिचय डाॅ.उत्तमराव रुद्रवार यांनी करून दिला .अविरत चालणाऱ्या सुधाकरराव नाईक स्मृती व्याख्यान पुष्पाचे हे २३ वे वर्ष या व्याख्यानपुष्पात अपर्णा पाटील पुढे म्हणाल्या की ,आई ही मुलाची पहिली शाळा आहे सावित्रीबाई घरोघरी आहेत पण ज्योतिबांचा शोध मात्र दारोदारी घ्यावा लागतो आहे.
आजच्या जोतिबाने म्हणजे प्रत्येक मुलाच्या वडिलांनी आपल्या मुलाला सांगितले पाहिजे की तू खुशाल पाय पसर अंथुरणाचं तुझा बाप बघून घेईल. जगण्याची खुमक आपल्या रक्तात असली पाहिजे तेव्हाच आपलं जगणं सुंदर होईल असेही त्या शेवटी म्हणाल्या .सदर व्याख्यान पुष्पाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. गजानन जाधव यांनी तर प्राचार्य रामचंद्र हिरवे यांनी उपस्थितांचे आभार मानले या व्याख्यान पुष्पासाठी पुसद परिसरातील नामवंत मान्यवर, पत्रकार ,रसिक श्रोते तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या विविध शाखेतील प्राचार्य ,मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.