जीवन समृद्धीसाठी वाचन संस्कृती जपणे आवश्यक प्रा. दिनकर गुल्हाने : देशभक्त शंकरराव सरनाईक सार्वजनिक वाचनालयात ग्रंथप्रदर्शन

पुसद: वाचनामुळे आपले भावविश्व, अनुभवविश्व विस्तारते. जगातले सर्व अनुभव आपण घरबसल्या घेऊ शकतो आणि एकाच जीवनात अनेक आयुष्य जगू शकतो . आपण पूर्वीपासूनच आपला सांस्कृतिक वारसा लिखित साहित्याच्या वाचनातून जतन करत आलो आहोत. जगात जर कोणती संस्कृती श्रेष्ठ असेल तर ती म्हणजे वाचन संस्कृती होय. अलीकडे वाचनाची नव्या पिढीत गोडी कमी झाली आहे . त्यामुळे वाचन संस्कृती जपणे आवश्यक आहे, असे विचार ज्येष्ठ पत्रकार तसेच लेखक प्रा .दिनकर गुल्हाने यांनी व्यक्त केले.
देशभक्त शंकरराव सरनाईक सार्वजनिक वाचनालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’या उपक्रमांतर्गत आयोजित ग्रंथ प्रदर्शनीचे उद्घाटन बुधवार ता. एक रोजी प्रा. दिनकर गुल्हाने यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष योगेश राजे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या सरनाईक सार्वजनिक वाचनालयाचे वाचन संस्कृतीतील योगदान मोठे आहे. या वाचनालया द्वारे राबविण्यात येणारा हा उपक्रम निश्चितच प्रशंसनीय आहे, या शब्दात श्री. गुल्हाने यांनी वाचन चळवळीच्या कार्याचा गौरव केला. यावेळी विश्वनाथसिंह बयास नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष निशांत बयास, पंजाब सुरोशे, वाचनालयाचे उपाध्यक्ष अनिल उत्तरवार, सचिव मुकुंद पांडे, सहसचिव अनिल तगडपल्लेवार, कोषाध्यक्ष रवी देशपांडे, सदस्य विजय उबाळे, निलेश मुराई, स्मिता वाळले, श्रीकांत सरनाईक, ऋषिकेश देशपांडे, सूर्यकांत रिठे, रमेश डंबोळे ,ग्रंथपाल नागेश गांधे, सुधाकर दीक्षित, कौस्तुभ पांडे तसेच वाचक सभासद उपस्थित होते.यानिमित्ताने वाचनालयात सामूहिक ग्रंथ वाचन, वाचन संवाद आयोजन, वाचन कौशल्य कार्यशाळा, स्वच्छता अभियान व विविध कार्यक्रम एक ते १५ जानेवारी दरम्यान घेण्यात येईल असे अध्यक्ष योगेश राजे यांनी ग्रंथ प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी सांगितले.पुसद येथील ज्येष्ठ लेखक स्व. शंकरराव पांडे यांचे जयंती निमित्त यावेळी पांडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच शंकरराव पांडे यांचे छायाचित्र वाचनालयाचे वाचन कक्षात लावण्यात आले. कार्यक्रमाच्या यशासाठी सहग्रंथपाल रणजीत सत्यपाल, लिपिक विलास पांडे, कर्मचारी बी. एस. बनसोडे, भुजंग वाढवे यांनी पुढाकार घेतला.