राज्यात दोन उपमुख्यमंत्री… मग प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये दोन उपसरपंच करा; तांडा सुधार समितीचे थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

पुसद:अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधून बंडखोरी केल्यामुळे पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी आपल्या आठ नेत्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यात आता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस असे दोन उपमुख्यमंत्री झाले आहेत. दरम्यान याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पुसद येथील तांडा सुधार समितीच्या जिल्हा कार्याध्यक्षांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अजब मागणी केली आहे. सध्या ज्याप्रमाणे राज्यात दोन उपमुख्यमंत्री कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील गावांच्या विकासासाठी दोन उपसरपंच निवड पद्धत लागू करण्याची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. तांडा सुधार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “जसे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपण मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्र्यांची निवड करू शकता, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी प्रत्येक गावात दोन उपसरपंच निवडीची परवानगी द्यावी. गावाच्या विकासासाठी सरपंचाला समर्थन देण्यासाठी व त्यांच्याकडून गावाचे काम करून घेण्यासाठी उपसरपंच हा महत्त्वाचा असतो. तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक गावा-गावातही अनेक गट असतात, त्या गटापैकीच अनेक जण ग्रामपंचायत सदस्य म्हणून वेगवेगळ्या पॅनेल मधून निवडून आलेले असतात. ग्रामपंचायत सदस्य झाल्यानंतर प्रत्येकालाच सरपंच किंवा उपसरपंच हे पद मिळावे अशी अपेक्षा सर्वांचीच असते. त्यातच सरपंचपद राखीव असले तर इतरांना म्हणजे सर्वसाधारण खुल्या सदस्यांना संधी मिळत नाही. त्यातून अनेक जण नाराज होतात, सदस्यांची फोडाफोडी होते व काही वेळा सदस्यांची पळवा पळवी देखील होते काही वेळा यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार देखील होतो त्यातूनच गाव पातळीवर मोठा तणाव निर्माण होऊन वाद विकोपाला जातो त्यामुळे दोन गटात भांडणे होतात व त्याचे दुष्परिणाम गावच्या विकासावर तर होतातच व गावात देखील राजकिय वातावरण दूषित होते. त्यामुळे शासनाने राज्य सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री केले त्या निर्णया प्रमाणेच दोन उपसरपंच निवडण्याची तरतूद केली तशीच राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकस विभागामार्फत तरतूद करण्यात यावी वस्ताद का शासन निर्णय जाहीर करावा अशी आशयाचे निवेदन तांडा सुधार समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य संजय मदन आडे पदाधिकाऱ्यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी पुसद यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे.



