शेतकऱ्यांनो सावधान..! पुसद शहरात बनावट खताचा साठा जप्त; तालुका कृषी अधिकाऱ्यांची धडक कारवाई!

पुसद:आधीच कमी पाऊस त्यात अर्धा अधिक खरीप हंगाम संपत आला असून तालुक्यासह जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहे.अशातच अवैध खते विक्री करणाऱ्यांनी विविध बोगस कंपन्या खते व औषधी विक्री करण्याचा शहरासह तालुक्यात गोरखधंदा सुरू केला आहे.पुसद शहर पो.स्टे हद्दीतील शंकर नगर मधील घरात १० लाख २४ हजार ३६० रु. किमतीचे ८३० बॅग बोगस खत अवैधरीत्या साठविल्याचे कृषी विभागाच्या पथकाने मारलेल्या धाडीत उघड झाल्याने येथे एकच खळबळ उडाली आहे. जप्त करण्यात आलेले बोगस खत हे आरोपीने गुजरात मधून आणल्याची कबुली दिली असल्याची माहिती आहे.तालुका कृषी अधिकारी विजय तुकाराम मुकाडे (४१) यांनी पुसद शहर पो.स्टे. मध्ये दिलेल्या तक्रारी नुसार त्यांना मिळालेल्या गोपनीय माहीती मध्ये गजानन सुरोशे यांचे घरी अनधीकृतपणे खताची साठवणुक केली असल्याचे व तेथुन विक्री करुन शेतकऱ्यांची फसवणुक करीत असल्याची गोपीनिऐ माहिती मिळाली होती. त्या माहीती वरुन जिल्हा कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, कृषी अधिकारी पुसद शंकर राठोड, कृषी अधिकारी महागाव अतुल कुमार कदम व इतर सहकार्यांनी शंकर नगर पुसद येथे गजानन सुरोशे यांच्या राहत्या घरी ३० ऑगस्ट चे रात्री ९:०० वाजण्याच्या सुमारास छापा टाकून कार्यवाही करण्यात आली. त्यामध्ये बनावट अनाधिकृत साठवलेले एकूण ८३० बँग खत किंमत एकूण १० लाख २४ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल मिळून आले. त्याबाबत आरोपी गजानन सुरोशे यांना विचारणा केली असता सदर खत गुजरात वरून येत असल्याचे सांगितले. याप्रकरणी आरोपीविरुध्द कलम ४२०, ४६३, ४६८, ३४ भादंवि सह कलम ७, १९, २१ रासायनिक अधिनीयम कायदा १९८५ सह कलम ३ (२) (डी) अत्यवश्यक वस्तू कायदा १९५५ सह क १९ (सी) (२), १९ (सी) (५) रासायनिक खत नियंत्रण आदेश १९८५ खंड ७ खंड १२ रासायनिक खत अधिनियमान्वये गजानन माधव सूरोशे यांचे घरातून मुद्देमाल जप्त केला. तो मुद्देमाल सूचनापत्र देवून त्याचे रहाते जागेमध्ये सिलबंद करून सुपूर्द करण्यात आला. या कारवाई मुळे पुसद मध्ये बनावट खतांचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनो रासायनिक खते व औषधी खरेदी करताना अधिकृत परवानाधारक विक्री केंद्रांतून आणि केंद्र व राज्य सरकारने मंजूर केलेल्या गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत ग्रेडच्या खत खरेदीस प्राधान्य द्यावे. कोणत्याही परिस्थितीत विनापरवाना विक्री होत असलेल्या ठिकाणाहून खरेदी करू नका रासायनिक खतांची खरेदी करताना काळजी घ्या.



