कोषटवार दौलतखान विद्यालयात फिरते रमण विज्ञान प्रदर्शन;विविध वैज्ञानिक प्रकल्पांचे सादरीकरण

पुसद :रमण विज्ञान केंद्र आणि तारामंडल राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय नागपूर अंतर्गत पुसद येथील कोषटवार दौलतखान विद्यालय व गोधाजीराव मुखरे कनिष्ठ महाविद्यालयात भ्रमणशील विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा आणि अभ्यासक्रमातील वैज्ञानिक संकल्पनांचे दृढीकरण व्हावे याकरिता भ्रमणशील प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येत असते. आकर्षक अशा भ्रमणशील फिरत्या वैज्ञानिक प्रदर्शनी मध्ये विविध प्रकल्प दाखविण्यात येत आहेत. विज्ञान मार्गदर्शक हरीश देशपांडे तथा तंत्रज्ञ रमेश बासकवरे यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखविले. विद्यालयातील सुमारे ३ हजार विद्यार्थ्यांनी भ्रमणशील प्रदर्शनीचा लाभ घेतला आहे. अभ्यासक्रमातील विविध संकल्पनांचा उलगडा सहजपणे व्हावा याकरिता रमण विज्ञान केंद्र आणि तारा मंडळ राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद नागपूर येथील भ्रमणशील विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांना दि.११ व १२ सप्टेंबर रोजी दोन दिवस दाखवण्यात येत आहे. यामध्ये स्थितीज आणि गतीज ऊर्जा, वाफेची टरबाइन, संवेग अक्षयता, मानवी शरीराची हालचाल आणि हाडांची जोड, विद्युत चुंबकीय न्युटनचा झोका, मानवी मेंदू, सौर ऊर्जा, अश्व शक्ती यासह अनेक प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात येत आहे. फिरत्या विज्ञान प्रदर्शनी मधील प्रकल्प विद्यार्थी भान हरखून पाहत आहेत.विद्यालयातील स्वयंसेवकांनी अतिशय स्पष्टपणे या प्रकल्पाचे सादरीकरण केले सादरीकरण करण्यापूर्वी त्यांना सादरीकरणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले होते. पुसद पंचायत समितीचे विज्ञान विभाग प्रमुख तथा शिक्षण विस्तार अधिकारी अमित बोजेवार यांच्या हस्ते प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक गजानन वायकुळे, उपमुख्याध्यापक रिता बघेल, पर्यवेक्षक मनोज नाईक तथा सर्व शिक्षकांची उपस्थिती होती. विद्यालयातील विज्ञान शिक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पुढाकारातून शिस्तबद्ध पद्धतीने विद्यार्थी प्रदर्शनीचे अवलोकन करीत आहेत.