शिष्यवृत्ती परीक्षेप्रसंगी विद्यार्थ्याकडून प्रामाणिकपणाचे दर्शन;’पैसे हरवले पण माणूसकी सापडली’!

पुसद : जीवनातील आधारभूत तत्वे जी योग्य अयोग्य चांगले वाईट यातील फरक समजून जगण्याची दिशा दाखवतात स्वतःशी आणि इतरांशी खरे वागणे म्हणजेच प्रमाणिकपणा हा दिवसेंदिवस लोप पावत असल्याची ओरड समाजातून होत असतांनाच एका विद्यार्थ्याने ज्ञानाबरोबरच शील,चारित्र्य,संस्कारासह नैतिक मूल्याचे आपल्या वर्तनातून आचरण करत सापडेले पैशाचे पाकीट परत करुन विद्यार्थ्याने प्रामाणिकपणासोबतच माणूसकीचे दर्शन घडविल्याची घटना घडली.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे व्दारा राज्यभर विविध केंद्रात रविवारी (ता.२२) इ.५ वी व इ.८ वी ची शिष्यवृत्ती परीक्षा (ता.२२) आयोजित करण्यात आली.भोजला केंद्रातील निंबी,कवडीपूर,पार्डी व येलदरी येथील इ.८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी निंबी येथील जिल्हा उच्च प्राथमिक शाळेत परीक्षा केंद्र होते.परीक्षेला पार्डी येथील मनोहरराव नाईक विद्यालयात इ.८ वी मध्ये शिकत असलेला सम्राट शुद्धोधन खडसे हा परीक्षेसाठी आला असता त्याला सुरक्षा भिंतीलगत पैशाचे पाकीट सापडले .त्यामध्ये जवळपास साडेचार हजार रुपये पॅनकार्ड,मतदान कार्ड,आधार कार्ड,ड्रायव्हींग लायसन्स,कुटुंबातील सदस्यांचे फोटो व अत्यंत महत्वाचे असलेले कागदपत्रे होती. त्याने पाकिटातील पैशावरील मोह आवरुन सापडलेले पाकीट परीक्षा केंद्र संचालक किरण कुंभारे यांच्या स्वाधिन केले.केंद्र संचालकांनी हरवलेल्या पाकीट मालकाची शोधा शोध केली व गावकर्यांना ही माहीती दिली.दरम्यान जयपाल राठोड रा.माऊली ता.मानोरा जि.वाशिम हे निंबीपासून ११ किमी अंतरावरील खंडाळा येथील पानटपरीवर काही वस्तू घेऊन दुकानदाराला पैसे देण्यासाठी खिशातील पाकीट काढत असतांना ते सापडत नव्हते. दरम्यान निंबी येथील लकडोबा देवस्थाना यात्रा व नवसाच्या निमित्ताने शाळेच्या सुरक्षा भिंतीवर बसल्याचे त्यांना आठवल्याने पाकीट बहुतेक शाळेत पडले असावे असा अंदाज बांधून शाळेच्या आवारात शोधा शोध करु लागले.दरम्यान केंद्र संचालकांनी त्यांच्या पाकीटाची शहानिशाकरुन सम्राट खडसे या विद्यार्थ्याने पाकीट परत केल्याचे सांगितले.दरम्यान सम्राट शिष्यवृत्तीचा पेपर सोडवत होता. पेपर संपल्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश काचगुंडे, किरण कुंभारे,शशिकांत जामगडे,सिमा येरावार,मदन गरकल, सतीश देशट्टीवार,राजीव बिरादर,गजानन मस्के यांनी त्याने दाखविलेला प्रामाणिकपणा व माणसूकी बद्दल सत्कार केला तर श्री.जामगडे यांनी रोख पाचशे रुपयांचे पारितोषिक देऊन त्याचेसह त्याच्यावर संस्कार करणारे पालक,शिक्षक यांचा गौरव केला.यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थी,पालक,शिक्षक व गावकर्यांनी त्याच्या ह्या कृतीतून इतरांसमोर आदर्श ठेवण्याचे आचरण केल्याने प्रामाणिकपणाचे कौतुक होत असून ‘पैसे हरवले माणूसकी सापडली’ अशी साद घातली.



