पुरात वाहून गेलेला ४५ वर्षीय व्यक्ती बेपत्ता; एनडीआरएफ च्या पथकाकडून शोधमोहीम सुरू!

पुसद: तालुक्यातील धनसळ येथे ता..२६ सप्टेंबर २०२३ रोजी नाल्याला आलेल्या पुरात मंगळवारी वाहत गेलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीचा आजही शोध लागला नाही.एनडीआरएफचे पथक व शासकीय यंत्रणा तसेच गावातील नागरिक त्यांचा शोध घेत आहेत. बाळू भीमराव पानपट्टे (वय ४५, रा. धनसळ), असे पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचे नांव आहे. तालुक्यात मागील दोन-तीन दिवसापासून मेघगर्जनेसह संततधार पाऊस सुरू आहे. २६ सप्टेंबर च्या पहाटेपासूनच तालुक्यासह शहरात मुसळधार पाऊस कोसळला काल दुपारी एकच्या सुमारास पावसाने थोडीशी विश्रांती दिली.या पावसामुळे शहरासह तालुक्यातील नदी नाले मोठ्या प्रमाणात ओसंडून वाहू लागले. अशातच तालुक्यातील धनसळ गावाजवळ असलेल्या नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात गावातील इसम बाळू भीमराव पानपट्टे (४५) हे दुपारी अंदाजे १२.३० च्या दरम्यान सदरील नाल्यावरील पूल ओलांडत असताना नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहात तोल जाऊन वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच गावचे सरपंच प्रवीण नाईक यांनी तातडीने जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी पुसद, तहसीलदार पुसद यांना घटनेची माहिती दिली.यवतमाळवरून एनडीआरएफ चे पथक धनसळ गावात दाखल होऊन त्यांनी सदरील व्यक्तीचा शोध मोहीम सुरू केली असून यांच्यासह सरपंच व गावातील नागरिक व युवकांनी सदरील पुरामध्ये वाहून गेलेल्या इसमाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु एनडीआरएफच्या पथकाला मात्र शोध लागला नाही तरीही शोध मोहीम सुरू आहे मात्र रात्री दरम्यान पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात अडथळे निर्माण होत असल्याने ही मोहीम तात्पुरती थांबवली होती. पुरात वाहून गेलेल्या बाळू भीमराव पानपट्टे यांना अंदाजे तीन मुले असून पत्नी आहे. घटनास्थळी एनडीआरएफ च्या पथकासह तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी अदी शासकीय अधिकारी तळ ठोकून बसले होते.