बारभाई तांडा हिवरा शेत शिवारालगत बिबट्याचा संशयास्पद मृत्यू: शेतकऱ्यात भीतीचे वातावरण!

महागाव/प्रतिनिधी (संदीप कदम):- महागाव तालुक्यातील काळी दौलत वनपरिक्षेत्र अंतर्गत असलेल्या बारभाईतांडा हिवरा शेतशिवाराच्या जंगल भागात बिबट मृतावस्थेत आढळून आल्याची घटना काल सोमवार दि. ६ नोव्हेंबर रोजी उजेडात आली. या घटनेची माहिती काळी दौलत वनपरिक्षेत्र कार्यालयाला देण्यात आली होती. काळी दौलत वनपरिक्षेत्राधिकारी मेश्राम साहेब, गुंज क्षेत्रसहाय्यक संतोष बदुकुले यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिसराची पाहणी केली दुपारी वनपरिक्षेत्र अधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अमित झा यांनी घटनास्थळाला भेट दिली.
काळी दौलत वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत आतापर्यंत बिबट, वाघाचे सर्वाधिक झाल्याची नोंद आहे. काहीच दिवसांपूर्वी याच भागात एक बिबट्या पूर्ण कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता याची सुद्धा वन विभागाला उशिरा माहिती मिळाली त्यामध्ये आणखीन एक नर बिबट्याच्या मृत्यूने भर पडली आहे. बिबट्याचे सर्व अवयव साबूत असल्यामुळे घातपाताची शक्यता पशुवैद्यकीय अधिकारी यांनी फेटाळून लावली आहे. बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला, ते तपासाअंतीच कळणार असून त्याचे नमूने प्रयोगशाळेला पाठवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मृत बिबट दोन ते तीन दिवसांपासून जंगलात पडून असल्यामुळे येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मृत बिबट्याचे वय अंदाज चार ते पाच वर्षे असून परिसरातील जंगलात वन विभागाची गस्त नसल्यामुळे मृत्यू निर्माण केल्या जात आहे असून नुकतीच रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून परिसरातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



