प्रधानमंत्री नरेंद्र मोदीं यांच्या यवतमाळ येथील सभेसाठी महिलांना आणण्यासाठी जिल्ह्यातून १९२५ एसटी बसेसची व्यवस्था!
पुसद तालुक्यातून ११३ बसेस तर जिल्ह्यातील प्रत्येक प्रत्येक गावात एक बस

पुसद: देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आज४:३० वाजता यवतमाळ येथील नागपूर मार्गावरील डोर्ली शिवारात महिला बचत गटांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्यासाठी ४५ एकरावर सभामंडप उभारण्यात आले आहेत.याच कार्यक्रमात वर्धा-कळंब या ३९ किमी ब्रॉडगेज रेल्वे लाइनसह प्रवासी रेल्वेचा शुभारंंभ होणार आहे. यासोबतच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता आणि पीएम किसान सन्मान निधीचा १६ वा हप्ता वितरित केला जाणार आहे. या सभेसाठी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. साडेतीन हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी या बंदोबस्तासाठी आहे.एसआरपीएफ, फोर्स वन, क्यूआरटी यांचे पथक याठिकाणी असणार आहे. प्रत्येकाची यावेळी तपासणी करून कार्यक्रमात एन्ट्री दिली जाणार आहे.या भव्य दिव्य सभेसाठी महिला बचत गटाच्या महिलांना उपस्थित राहण्याचे संबंधित प्रशासनाने आदेश दिले आहेत त्याबाबत आज यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक गावातून बचत गटांच्या महीला आणण्यासाठी जिल्ह्यातून १९२५ एसटीबसेसची संबंधित प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली असून यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावातून बचत गट महिलांना सभास्थळी आणण्यात येणार आहे.
पुसद तालुक्यातून या कार्यक्रमासाठी ११३बसेसची व्यवस्था करण्यात आली असून यासाठी लातूर आगारातून ४०बसेस,जालना आगारातून २५बसेस तर परभणी आगारातून १५बसेस आणि पुसद आगारातून ३३बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.पुसद आगारातून लांब पल्ल्याच्या तसेच गावागावात जाणाऱ्या मुक्कामी बसेस कालपासूनच रद्द करण्यात आल्या आहेत . पुसद आगारातून मुक्कामी जाणाऱ्या बसेस रद्द झाल्याने ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रचंड प्रमाणात ञास सहन करावा लागत आहे तसेच कालपासूनच प्रवाशांची प्रचंड प्रमाणात हेळसांड होत असून प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून भाजपाकडून यवतमाळ जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे. प्रचाराचाच एक भाग म्हणून मागील चार पाच दिवसांपूर्वी गावागावातून अयोध्या दर्शनासाठी १६००रुपयांत अनेक नागरिकांना भाजपा कडून नेण्यात आले होते.त्याही भाविकांची आज मोदींच्या सभास्थळी हजेरी लागणार आहे.
मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यातील बचत गटाच्या महिलांना फोन येत असून सभेला उपस्थित राहणे अनिवार्य आहे अन्यथा तूमच्या गटाला लोन मिळणार नाही अशी सुचनावजा धमकी दिल्या जात असल्याच्या तक्रारी महीला करीत आहेत. नरेंद्र मोदी यांच्या भव्यदिवे सभेसाठी एवढ्या प्रचंड प्रमाणात होत असलेला खर्च कुठून होत आहे. सर्वसामान्य जनतेच्या पैशाची उधळपट्टी सरू असल्याबाबत बाबत जनमानसात चर्चेला उधाण आले आहे.