पुसद नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकारणात उलथापालथ; पुसद भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ.अनिता भारत चव्हाण पाटील यांचा अखेर राजीनामा!

पुसद : भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्ते व पुसद महिला मोर्चाच्या अध्यक्षा तथा माजी नगर सेविका सौ.अनिता भारत चव्हाण पाटील यांनी ऐन नगरपरिषदेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना पक्षातील गटातटाच्या राजकारणामुळे तसेच पक्षात सन्मान जणक वागणूक मिळत नसल्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पुसद भाजप पदाधिकाऱ्यांचा वाद चव्हाट्यावर आल्याचे चित्र आहे. राजकीय परिस्थितीनुसार महायुतीमधील घटक पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी स्वतंत्र निर्णय घेण्यास सुरुवात केली असल्यामुळे नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुती दुभंगल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना महायुतीमधील तिन्ही पक्ष एकत्रित सामोरे जाणार असल्याचे महायुतीचे नेते सांगत असताना प्रत्यक्षात मात्र निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर स्थानिक पातळीवर राजकीय परिस्थितीनुसार महायुतीमधील घटक पक्षांच्या नेत्यांनी स्वतंत्र निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. नेत्यांच्या निवडणुकीत मात्र महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्रित राहिले, पण कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे ही नगर परिषदेची निवडणूक दुरंगी होण्याऐवजी आता तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सौ अनिता भारत चव्हाण पाटील यांनी राजीनामा दिल्याने, पक्षातील वाद चव्हाट्यावर आला होता. पुसद भाजपा महिला मोर्चाचे अध्यक्षा माजी नगरसेविका सौ. अनिता भारत चव्हाण यांनी दि १५ नोव्हेंबर २०२५रोजी पक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला असून त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून लगेच आपला नगरसेवक पदाचा अर्ज दाखल केला आहे.सौ. अनिता चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष निलेश पेंशनवार यांच्याकडे राजीनामा देताना वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे परंतु पक्षांतर्गत नाराजी मुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे सर्वत्र बोलल्या जात आहे. भाजप पक्ष या शहरात ज्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जिवंत ठेवला त्याच जुन्या निष्ठावंतांना डावलून आयाराम गयारामांना तिकीट देण्यात येत असल्याने त्या नाराजी मुळेच सौ.अनिता चव्हाण यांनी राजीनामा दिल्याची सर्वत्र चर्चा आहे. मात्र स्थानिक भाजपमध्ये महिला पदाधिकारी महिलाचा सन्मान करीत नसल्यामुळे गटातटाच्या राजकारणामुळे खदखद असल्याची चर्चा सुरू झाली आहे.



