ईतर

कंत्राटदाराच्या ढिसाळ कारभारामुळे पूस नदीवरील पुलाचे बांधकाम संथगतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष!

अर्धवट पुलाच्या बांधकामामुळे मार्गावर दररोज वाहतूक कोंडीने प्रवाशांची डोकेदुखी! 

पुसद : शहरात ये-जा करण्यासाठी असलेल्या हामरस्त्यांवर मागील एक वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पुस नदीवरील मोठ्या पुलाचे  बांधकाम सुरू आहे मात्र पुलाच्या कामात गती नसल्याने हे काम अपूर्णच आहे तर पिलरचे काही काम पूर्ण झाले असून इतर काम शिल्लक असल्याने नागरिकांना या रस्त्यांवरुन ये-जा करताना वाहनधारकांना तसेच शाळांतील विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असुन अर्धवट पुलाच्या बांधकामामुळे या मार्गावर दररोज वाहतूक कोंडीने प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे.

कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करूनही पूल अर्धवट अवस्थेत असताना, संबंधित विभागमात्र कंत्राटदारावर मेहरबान असुन या कामाची व मुदतवाढ दिली जात आहे. परंतु या पुलाच्या बांधकामांच्या ठिकाणी या कामांची माहिती देणारे फलक लावण्याचे विस्मरण सार्वजनिक बांधकाम उपविभागांला संबंधित कंत्राटदाराला झाले आहे. या पुलाचे बांधकामांच्या ठिकाणी संबंधित कामाचे स्वरूप, काम पूर्ण होण्याचा अपेक्षित कालावधी,कीती संबंधित काम करणारा कंत्राटदार कोण, या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोणत्या अभियंत्यांची आहे त्याचे नाव आणि संपर्क क्रमांक असे माहिती फलक लावण्याच्या सूचनांकडे या विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.संबंधित कंत्राटदारांकडून हे माहिती फलक लावण्यास टाळाटाळ केली जात असूनही अटी-शर्तींचा भंग केल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंताकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही.पुलाच्या कामाच्या ठिकाणी फलक न लावणे हे शासन नियमांचे उल्लंघन आहे. या नियमांनुसार, कंत्राटदाराने कामाच्या ठिकाणी कामाचे स्वरूप, मंजूर रक्कम, आणि इतर आवश्यक माहिती देणारा फलक लावणे बंधनकारक आहे. फलक न लावल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते आणि स्थानिक लोकांना कामाबद्दल कोणतीही माहिती मिळत नाही, पुलाखाली पाणी असल्याने संबंधित कंत्राटदाराने थातूरमातूर खोदकाम करून पुलाच्या भिंती उभ्या केल्या. मात्र, जमिनीमध्ये पाहिजे तशा प्रमाणामध्ये पाया केला नसल्याने या पुलाच्या बांधकामावर किती दिवस तग धरेल हे सांगणे कठीण आहे.सदर पुलाच्या अंदाजपत्रकामधील मिक्स डिझाइनमधील कामामध्ये मातीमिश्रित ओढ्या नाल्याची माती मिश्रित रेती किंवा गिट्टी खदानवरील डस्ट (बुकटी) हे वापरण्यास मनाई आहे तरीही कंत्राटदारांनी जाणीवपूर्वक या पुलाच्या कामामध्ये परिसरात वाहणाऱ्या नाल्यातील मातीमिश्रीत वाळूचा उपयोग केला जात आहे.

तसेच, गिट्टीवरील टाकाऊ खनिज घटकांमधील डस्ट (माती मिश्रित बुकटी) या ठिकाणी आणून काँक्रीटमध्ये मिक्स केले जात आहे. त्यामुळे या पुलाचे भविष्य टांगणीला लागले आहे.सदोष बांधकामामुळे या पुलाच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे या बांधकामाकडे अक्षम्य दुर्लक्ष याला कारणीभूत ठरत आहे.या अर्धवट अवस्थेत असलेल्या आणि संथ गतीने सुरू असलेल्या कामांमुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत आहे.या पुलाचे काम संथगतीने सुरू असताना प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काम सुरू असताना कोणत्याही प्रकारची खबरदारी घेण्यात येत नाही. दिशादर्शक फलक, गती नियंत्रणााठी रम्बलर, गर्डर लावले नाही अधिकचे वॉर्डन, उपस्थित राहत नाहीत. रात्रीच्या वेळी वाहनचालकांना दिसण्यासाठी रिफ्लेक्टर लावणे, बॅरिकेडिंग करणे अशा उपाययोजना करण्याची गरज आहे. मात्र त्या कुठेही दिसत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी मोठा एखादा अपघात होण्याची संबंधित प्रशासन व कंत्राटदार वाट पाहत आहे की काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.कित्येक दिवसापासून सुरू असलेल्या पुस नदीवरील पुलाच्या बांधकामामुळे व कंत्राटदारांच्या ढिसाळ कारभारामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठा त्रास होतो. सकाळी शाळकरी मुलांसह ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच शेतकऱ्यांना आणि संध्याकाळी घरी परतणाऱ्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. ‘‘दोन मिनिटांचा रस्ता ओलांडण्यासाठी १५ मिनिटे वेळ लागत आहे.पुलाच्या संथगतीच्या कामामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या ठिकाणी वाहतूक कोंडी नित्याचीच होत बसली असून, प्रशासनाकडून कोणत्याही तातडीच्या उपाययोजना होताना दिसत नाहीत.सार्वजनिक बांधकाम विभाग तथा सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयापासून हाके च्या अंतरावर पूस नदीवरील पुलाचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम करीत असताना करारामध्ये नमूद केलेल्या शर्ती,अटी, नियमानुसार बांधकाम होत आहे का नाही याची साधी शहानिशा करण्याची फुरसत सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांना नसल्याची जनमानसात चर्चा आहे. संबंधित कंत्राटदाराने या पुलाचे बांधकाम करीत असताना शासनाच्या वतीने ज्या नियम, अटी, शर्ती लागू केलेल्या किंवा अंदाजपत्रकाला डावलून लोखंड गिट्टी,रेती, सिमेंटचा वापर संबंधित कंत्राटदारांकडून केला जात आहे.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अभियंता व ठेकेदाराने संगनमत करून थातुरमातुर पद्धतीने पुलाचे काम करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. या कामाचे गुणनियंत्रण अधिकाऱ्यांनी मूल्यमापन करून संबंधितावर कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून कडक कारवाई करावी, तसेच याा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सुद्धा या कामाकडे लक्ष घालून संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याची कान उघडनी करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेच्या वतीने केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close