हिंदी वाचनालय संस्कृतीचा ऐतिहासिक ठेवा – सौ. मोहिनी ताई नाईक सामाजिक कार्यकर्त्या!

पुसद : हिंदी वाचनालयामध्ये उपलब्ध पुस्तके हे केवळ साहित्य नसून आपल्या सर्वांच्या पूर्वजांनी गाव धर्माचा आदर करीत आणि वाचन संस्कृतीचा सन्मान करीत आई सरस्वतीच्या आशीर्वादाच्या स्वरुपाने हे सारस्वताचे दालन आपल्याला उपलब्ध करून दिले आहे.त्यामुळे हे केवल वाचनालय नसून पूर्वजांचे आशीर्वाद असल्याचे मत नाईक फाउंडेशनच्या अध्यक्ष मोहिनीताई नाईक यांनी व्यक्त केले.
पुसद शहरातील ८८ वर्ष जुन्या शासनमान्य असलेल्या हिंदी वाचनालयाला नाईक फाउंडेशनच्या अध्यक्ष मोहिनीताई इंद्रनील नाईक यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी हिंदी वाचनालयाचे अध्यक्ष धनंजय सोनी यांच्या हस्ते लोकमत मीडिया लिमिटेडचे एडिटर इन चीफ माजी खासदार डॉ. विजय दर्डा लिखित “न संपणारे शब्द ” हे ग्रंथ तसेच यावेळी हिंदी वाचनालयाचे मानद सचिव व हिंदी साहित्यिक दिवंगत गिरधारीलाल अग्रवाल यांनी लिहिलेले हमारी लाडली पुसद नगरी व हिंदू देवता और विज्ञान हे ग्रंथ भेट देऊन मोहिनीताई नाईक यांचा सत्कार करण्यात आला.
हिंदी वाचनालयाला माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक, माजी मंत्री मनोहरराव नाईक यांनी यापूर्वी सदिच्छा भेटी दिल्या आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या सहकार्याने १९९४ साली वाचनालयाच्या नवीन बांधकामासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांच्याकडे विशेष शिफारस करून मुख्यमंत्री फंडातून पाच लाख रुपयाचे अर्थसाह्य मिळवून दिले होते.
आपल्या भेटी दरम्यान त्यांनी वाचनालयाची मोठ्या आत्मीयतेने माहिती घेतली. हिंदी वाचनालयाच्या संकल्पना पूर्ण करण्यासाठी निश्चित सहकार्य करू असे आश्वासन मोहिनीताई नाईक यांनी दिले. याप्रसंगी हिंदी वाचनालयाचे अध्यक्ष धनंजय सोनी,सचिव अखिलेश अग्रवाल संचालक मनोज बजाज, व विजय कडू यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होते.