शेतकरी समृद्धीसाठी तंत्रज्ञान आणि बाजारपेठचे सरकारने धोरण बदलावे ललितदादा बहाळे : पुसद येथे वसंतराव नाईक शेतकरी गौरव कार्यक्रम

पुसद: शेती विश्वावर आता ‘एआय’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि ‘जीएम’ (जनुकीय संशोधित) चा प्रभाव राहणार आहे. त्यामुळे शेतकरी समृद्धीसाठी तंत्रज्ञान आणि बाजारपेठ याबद्दलचे सरकारने धोरण बदलणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित दादा बहाळे यांनी केले.हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनानिमित्त पुसद येथे मंगळवार ता.एक रोजी ईश्वर फाउंडेशन दिग्रस च्या वतीने २० प्रयोगशील शेतकऱ्यांचा शाल श्रीफळ मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बहाळे बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार संजय देशमुख होते. यावेळी व्यासपीठावर कृषिभूषण दीपक आसेगावकर, कृषी शास्त्रज्ञ प्रा. गोविंद फुके, ॲड. आशिष देशमुख, शरद मैंद, अनुकूल चव्हाण, दयाराम चव्हाण, डॉ. मोहम्मद नदीम, उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, तहसीलदार महादेव जोरवर, तालुका कृषी अधिकारी विजय मुकाडे, विजय नवल, मिलिंद दामले, दीपक आनंदवार, प्रवीण शिंदे उपस्थित होते.बहाळे पुढे म्हणाले की, देशाचे पहिले पंतप्रधान सोडले तर प्रत्येकाने शेती प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतीचे प्रश्न सुटत नाही, ही वस्तुस्थिती आहे. सिलिंग व जीवनावश्यक वस्तू कायदा यामुळे कधी काळी भूस्वामी असलेले शेतकरी आधी भोगवटदार व आता भूमीहीन होत आहे, जमीन तुमची राहिली नाही, ती गहाण देता येत नाही. त्यामुळे किमतीच्या प्रमाणात शेतीवर कर्ज मिळत नाही, ही चिंतेची बाब आहे. कारखानदारीप्रमाणे शेतकऱ्याला उत्पादक समजल्या जात नाही. शेतमालाचा भाव खुल्या बाजारात ठरतो. शेतीतील प्रचंड उत्पादन देणाऱ्या जीएम तंत्रज्ञानाच्या स्वातंत्र्याचा आज संघटने कडून आग्रह धरल्या जात आहे. शेती तील तंत्रज्ञान व बाजारपेठेचे स्वातंत्र्य मिळाले तर शेतकऱ्यांना शेतीतून पैसा मिळू शकेल. कमाईचे साधन बळकट केल्याशिवाय आर्थिक सुधारणा होणार नाही. त्यामुळे शेतमालाला भाव मिळण्यासाठी तंत्रज्ञानाची जोड आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.डॉ. उत्तम रुद्रवार म्हणाले की, वसंतराव नाईक यांनी दैववादी बनलेल्या शेतकऱ्यांना प्रयत्नवादी व विज्ञानवादी बनविले. त्यांच्या काळात युद्ध, दुष्काळ, भूकंप अशी प्रचंड आव्हाने होती मात्र ते समर्थपणे सामोरे गेले. त्यांच्या संकल्पनेनुसार उद्योग व शेतीचा समन्वय घालण्याची आज गरज आहे. प्रा. गोविंद फुके यांनी वसंतराव नाईक यांच्याप्रमाणे शेतीवर प्रेम करणाऱ्या नेत्यांची गरज असल्याचे सांगितले. शेती शाश्वत असून ती कितीही संकटे आली तरी टिकणार आहे. खचून जाण्याची गरज नाही. शेतीचे स्वरूप बदलावे लागेल एवढेच, असे मत व्यक्त केले. दीपक आसेगावकर यांनी शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले. डॉ. नदीम यांनी वसंतराव नाईक यांच्या कार्याला आणखी उजाळा मिळण्याची गरज व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांच्या न्यायासाठी झटणार : खासदार संजय देशमुख
कै.वसंतराव नाईक यांनी शेती व शेतकऱ्यांसाठी तळमळीने काम केले. राज्य सरकार शेतकरी प्रधान राहिले नाही. ते पुढारी- अधिकारी- व्यापारी प्रधान झाले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न मी लोकसभेत मांडणार असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. प्रगतिशील शेतकऱ्यांचा दरवर्षी कृषी दिनी प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव करण्याचा मानस आहे.
पत्रकार प्रा. दिनकर गुल्हाने यांचा गौरव…
दैनिक ॲग्रोवन मध्ये प्रगतिशील शेतकऱ्यांच्या यश कथा प्रसिद्ध करून कृषी कार्याला प्रेरणा दिल्याबद्दल दैनिक ॲग्रोवनचे पत्रकार प्रा. दिनकर गुल्हाने यांचा शाल ,श्रीफळ, मानचिन्ह देऊन खासदार संजय देशमुख व कृषी शास्त्रज्ञ प्रा. गोविंद फुके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दिनकर गुल्हाने यांनी नेहमी आपल्या लेखणीतून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वेळोवेळी वाचा फोडली आहे. प्रास्ताविक रंगराव काळे यांनी केले. शेतकरी निवड समितीचे अध्यक्ष वैभव फुके यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता पाटील यांनी केले. अरुण पुलाते, वैभव फुके ,राजू वाकडे , रवी पांडे, संजय भोने व सहकारी यांनी कार्यक्रमाच्या यशासाठी पुढाकार घेतला.पुरुष व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कार मूर्ती शेतकरी
निशांत राउत (भोजला), किशोर साखरे(बोरगडी), मनिष जाधव (वागद काळी),प्रा. दिनकर गुल्हाने(पुसद),शरद देशमुख (डोंगरगाव), लक्ष्मण जाधव (धुंदी ),
आकाश प्रकाश जाधव (जाधव वाडी),किशोर खेरासिंग राठोड (काटखेडा), संजय तांबारे ( दगड धानोरा)
ज्योती शंकर चव्हाण (वरूड),देवराव तडसे (माणिकडोह),रविंद्र पुंड (वेणी ) ,सरिता रूपेश जाधव (गहुली),नितेश शेजपाल (पुसद) मोहीनी देशमुख (बांशी),लेक संचालीत साधन कृषी सेवा केंद्र (मांडवा),किरण हरिमकर(रोहडा),शिवाजी मस्के(बेलोरा),विलास मंदाडे(चिलगव्हाण)
……………………



