नातेवाइकांनी प्रेमप्रकरणास विरोध केल्याने प्रेमीयुगुलांची आत्महत्या: वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हृदयाचा थरकाप उडविणारी ही घटना!
बदनामी पोटी नातेवाईकानी मृतदेहाचा केला अंत्यसंस्कार!

पुसद : वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गणेशपुर तांड्यात नातेवाइकांनी लग्नास विरोध केल्याने प्रेमीयुगलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हृदयाचा थरकाप उडविणारी ही घटना दि.७ डिसेंबर २०२४ रोजीच्या दुपारी अंदाजे २:०० ते ३:०० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.आत्महत्या केल्याची माहिती दोघांच्याही कुटुंबीयांना कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोघांचाही मृतदेह खाली उतरून बदनामी होईल या भीतीने रात्रीच्या अंधारातच दोघांचेही मृतदेह जाळून टाकल्याची घटना पोलिसांसमोर उघडकीस आली आहे. सदर घटनेची गोपीनिय माहिती पोलिसांना मिळतात अप्पर पोलीस अधीक्षक पियूष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा ताफा दि.८ डिसेंबर २०२४ रोजीच्या दुपारी १२:०० ते १२.३० वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले व आत्महत्याग्रस्त प्रेमीयुगलांच्या नातेवाईकांना विचारपूस केली असता संबंधित नातेवाईकांनी पोलिसास कोणतेही माहिती देण्यास तयार नसल्याचे समजते. त्यामुळे ही पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.याबाबत पोलीस सूत्राची प्राप्त माहिती अशी की, पुसद तालुक्यातील गणेशपुर तांड्यात रहिवासी असलेले आस्तिक गणेश राठोड वय २२ वर्षे व पल्लवी भीमराव पवार वय २० वर्षे असे आत्महत्या करणाऱ्या प्रेमी युगलांचे नाव आहे. आस्तिक व पल्लवीचे एकमेकांवर प्रेम होते. त्या दोघांचे प्रेम त्यांच्या कुटुंबीयांना माहीत झाल्याने नातेवाइकांनी या प्रेम प्रकरणाला विरोध केल्याने याचाच राग मनात धरून आस्तिक ने त्याच्या राहत्या घरी पल्लवीला घटनेच्या दिवशी दुपारी बोलविले. त्यानंतर दोघांनीही रागाच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेच्या दिवशी बराच वेळ पल्लवी घरी न आल्याने तिचा भाऊ उमेश पवार वय १८ वर्षे हा आस्तिकच्या घरी शोधण्यासाठी गेला असता त्या दोघांनीही आत्महत्या केल्याची माहिती त्याला कळाली.त्यानंतर त्याने त्याच्या आईवडिलांना घटनास्थळावर बोलावून घेतले. त्यानंतर आस्तिकच्या कुटुंबीयांना देखील घटनास्थळावर बोलवून घेतले. दोन्ही कुटुंबांयांनी बदनामी होईल या भीतीने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता व गावात कोणालाही कळू सुद्धा दिलेले नव्हते.त्यानंतर दोन्हीही कुटुंबांनी पल्लवी व आस्तिक चा मृतदेह रात्रीच्या अंधारात अंत्यसंस्कार करण्यात आला.परस्पर मृतदेह जाळल्यामुळे पोलिसांना त्यांचे शवविच्छेदन देखील करता आले नाही.
पोलिसांना या घटनेची माहिती गोपीनिय सुत्रांकडून मिळाल्याने पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले व घटनास्थळ गाठले..
गणेशपुर तांड्यातील सदर घटनेची माहिती वसंत नगर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सतीश जाधव यांना त्यांच्या सूत्राकडून मिळाली असता त्यांनी त्यांचे वरिष्ठ अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बी.जे. यांना कळविले. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी हर्षवर्धन बिजे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकाला कळविले.त्यानंतर त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांचा मार्गदर्शनाखाली दि.८ डिसेंबर २०२४ रोजीच्या दुपारी १२ ते १२.३० गणेशपुर तांडा येथे वसंत नगर पोलीस स्टेशनचा पोलीस ताफ्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी यांचाही पोलीस ताफा दाखल झाला. त्यानंतर दोन्हीही कुटुंबीयांची सखोल चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता दोन्हीही कुटुंबीयांनी पोलिसांना सहकार्य केले नसल्याचे वास्तव समोर आले. त्यावेळी वसंत नगर पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्या केल्याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून या प्रकरणाचा अधिक तपास वसंत नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत.



