पुसद मतदारसंघातील १० गावातील तांडा वस्तीत उभारणार भव्य वाचनालय ; राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पाठपुराव्याने२.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर!
निवडणूक काळात गायमुख नगरच्या नागरिकांना दिलेला 'शब्द' राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी अजुनही पाळला नाही!

पुसद : विधानसभा मतदारसंघात बंजारा समाजाचे प्राबल्य असून ते राजकीयदृष्ट्या सक्रिय असुन बंजारा समाज हा निर्णायक भूमिकेत असून, लोकसंख्येच्या दृष्टीने हा घटक निवडणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो येथील ग्रामपंचायत व ग्रामीण भागात बंजारा समाजाचे मोठे मतदान आहे, त्यामुळे१९५२ पासून आजतागायत या मतदारसंघात नाईक कुटुंबाचेच वर्चस्व राहिले आहे. मात्र यावर्षी बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेले संत सेवालाल महाराज यांच्या जयंती वरून बंजारा समाजातील तरुणांमध्ये संपूर्ण मतदार संघात नाराजीचा सुरू उमटला आहे त्यातच आता २१ मार्च२०२६ रोजी माजी मुख्यमंत्री कै.वसंतरावजी नाईक यांचे सुपुत्र निरंजन नाईक हे समाजाला प्रबोधन करण्यासाठी पुसद शहरात येणार असून त्यांच्या कार्यक्रमाला जागा उपलब्ध होऊ दिली जात नाही या कारणाने बंजारा समाजाच्या तरुणांमध्ये राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याविरुद्ध संतापाचे वातावरण आहे. वर्षानुवर्षे एकाच कुटुंबाची सत्ता असून सुद्धा मतदारसंघातील तांडे आजही विकासापासून कोसो दूर आहेत परंतु आता तांड्यांच्या शैक्षणिक विकासासाठी राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांना जाग आली असून त्यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मतदारसंघातील १० गावातील तांडा वस्तीमध्ये आधुनिक वाचनालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यांच्या पाठपुरावाल्या यशही आले आहे. या उपक्रमासाठी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी एकूण २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे.या योजनेअंतर्गत मतदार संघातील पुसद तालुक्यातील काकडदाती, बांन्सी, फुलवाडी, मोहा ई, लाखी, लोहरा ई, वडगाव, हुडी बु, महागाव तालुक्यातील कोंणदरी ई,तुळशी नगर या गावातील तांडा वस्तीमध्ये प्रत्येक वाचनालयाच्या बांधकामासाठी २५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, त्यामुळे पुसद मतदारसंघातील १० गावातील तांडा वस्तीमध्ये लवकरच भव्य वाचनालयांची उभारणी होणार आहे. प्रशासकीय मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होताच या कामांना सुरुवात होणार असल्याची सूत्राची माहिती आहे.पुसद मतदारसंघ हा बंजारा समाज बहुल भाग असून येथे या समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. बंजारा समाजाचे नेतृत्व मागील सुमारे ७० वर्षांपासून नाईक परिवार करत आला आहे. समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळावे, यासाठी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी विशेष पुढाकार घेत हा निधी मंजूर करून घेतला आहे.बंजारा समाजातील अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती मर्यादित असल्याने स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांमध्ये जाऊन शिक्षण घेणे अनेकदा शक्य होत नाही. ही अडचण लक्षात घेऊन गावपातळीवरच आभ्यासासाठी योग्य वातावरण उपलब्ध व्हावे, या उद्देशाने वाचनालयांची उभारणी करण्यात येत आहे.या वाचनालयांमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होणार असून, स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी योग्य वातावरण निर्माण होणार आहे. परिणामी विद्यार्थ्यांना आपल्या गावात राहूनच मोठी स्वप्ने पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.दरम्यान, बंजारा समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी घेतलेल्या या पुढाकाराबद्दल समाजामध्ये राज्यमंत्री इंद्रनील नाईक व नाईक परिवाराबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यात येत आहे. आगामी काळात या वाचनालयांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परंतु विधानसभेच्या वेळी निवडणूक काळात इंद्रनील नाईक यांनी मतदार संघातील गायमुख ग्रामपंचायतीच्या हद्दीत स्टडी सर्कल निवडणूक झाल्या झाल्या सुरू करणार असल्याचा शब्द त्या गावातील नागरिकांना त्याच नाईक बंगल्यावर झालेल्या पत्रकार परिषदेत दिला होता तो शब्द अजूनही पाळला नाही किंवा राज्यमंत्र्यांना त्यांनी दिलेल्या शब्दाचा त्यांनाच विसर पडला की काय? असा प्रश्न गायमुख नगर येथील नागरिकांकडून खंत व्यक्त करीत विचारला जात आहे. किंवा मतदारसंघात सध्या आपल्याबद्दल असलेली नाराजी पाहता हा निधी जाणीवपूर्वक तांडा वस्तीना दिला जात आहे कां असाही प्रश्न मतदारसंघातील समाज बांधवांच्या वतीने उपस्थित केला जात आहे.
तांड्यांच्या शैक्षणिक व भौतिक विकासासाठी नाईक परिवार कटीबद्ध असून येत्या काळात पुसद मतदार संघातील सर्व गावात वाचनालय विकसित करण्याचे स्वप्न आहे..– राज्यमंत्री इंद्रनील नाईक



