
पुसद : शहरात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नुकत्याच जन्मलेल्या नवजात बाळाला रस्त्याच्या कडेला बेवारस फेकून देण्यात आल्याची घटना रविवारी रात्री ९:०० वाजण्याच्या सुमारास येथील बीएसएनएल कार्यालयासमोर एका ऑटो एजन्सीजवळ उघडकीस आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून ही घटना बाळाचा परित्याग केल्याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात पालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.ही घटना अनैतिक संबंधातून घडली असावी अशी चर्चा शहरात सुरू आहे .याबाबत प्राप्त माहिती अशी की,पुसद शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील परिसरात रविवारी अचानक अवकाळी पाऊस झाला. या दरम्यान वीज पुरवठा खंडित झाल्याचा फायदा घेत कोणत्यातरी अज्ञात मातेने किंवा पालकांनी चक्क पोटच्या गोळ्यांचा जन्म होताच येथील बीएसएनएल कार्यालयाच्या समोरील बाजूस असलेल्या एका ऑटो एजन्सीच्या परिसरात रस्त्याच्या कडेला नवजात बाळाला बेवारस फेकून दिले. सदर बाळ हे पुरुष जातीचे असल्याची माहिती असून या घटनेची माहिती नागरिकांनी पुसद शहर पोलिसांना दिली. त्यावेळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांनी ताफ्यासह तात्काळ घटनास्थळ गाठून रस्त्याच्या कडेला फेकलेल्या एक तासापूर्वी जन्मलेल्या नवजात बाळाला उचलून उपजिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉ. अविनाश जाधव, डॉ. आशिष कदम, डॉ. उमाशंकर अवस्थी आदींनी तातडीने त्या बळावर प्राथमिक उपचार केले. व पुन्हा या बाळाला १०८ रुग्णवाहिकेद्वारे यवतमाळ येथे पुढील उपचारासाठी रेफर केले. १०८ रुग्णवाहिकेचे डॉ. उमाशंकर अवस्थी, चालक गणेश काईट, नर्स सविता कपाटे, पल्लवी ताटेवार, पोलीस शिपाई अनिल गारवे आदींनी बाळाला यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुखरूप पोहोचविले. अज्ञात पालकांनी त्या नवजात बाळाचा परीत्याग करण्याच्या उद्देशाने नवजात बाळाला रस्त्याच्या कडेला बेवारस पोटच्या गोळ्याला मरण्यासाठी फेकून देणाऱ्या माता-पित्याबाबत सर्व स्तरातून निषेध व संताप व्यक्त होत आहे.सदर घटनेची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल अतुल दातीर यांनी शहर पोलीस स्टेशन पुसद येथे दाखल केली असून शहर पोलीसांनी रविवारी ता.२६मे२०२४ रोजी रात्री ११.४२ वाजण्याच्या सुमारास अज्ञात पालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पंचक्रोशीतील पसरली परंतु ही घटना मानवतेला काळीमा फासणाऱी आहे या घटनेचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे. आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी जोरधरु लागली आहे.तर सापडलेल्या बाळावरून महिलेची एका तासापूर्वीच प्रस्तुती झाल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. यावरून पोलिस आता परिसरातील चौकशी करीत आहे.