ईतर

इडा पिडा टळू दे… बळीचे राज्य येवू दे… शेणाच्या गायवाड्यातून मांडले जातेय सुख समृद्धीचे दृश्य

पुसद : गायीच्या शेणापासून पाच पांडव आणि गायवाडा भाऊबीजेच्या दिवशी सकाळी सकाळी घराच्या अंगणात साकारण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे. राज्यातील प्रत्येक कुणब्याच्या घरासमोर ही कलाकृती साकारल्या जाते. पुसद येथील प्रतिथयश बालरोग तज्ज्ञ डाॅ.भानुप्रकाश कदम यांच्या पत्नी आशाताई कदम यांनी आपल्या बोरगडी गावातील अंगणात आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीपुढे अठरापगड जातीसह एकत्र कुटुंब पद्धतीतील सदस्यांच्या कार्याची प्रतिकृती गावगाड्यातून साकारुन आपल्या नातवंडांना त्याचे महत्व विषद केले.हजारो वर्षांपूर्वी भारतीय बहुजन समाजाचा एक अत्यंत सद्गुणी,प्रजाहीतदक्ष व सामर्थ्यशाली असे व्यक्तीमत्व म्हणून बळीराजाचे नाव घेतल्या जाते.त्यांच्या काळात शेती समृद्ध होती व प्रजा सुखी होती.दसर्‍याच्या दिवशी बळीराजाला कपटाने मारल्यानंतर बळीपूत्र बाणासुराने प्रजेला धीर देत दसर्‍यानंतर एकवीस दिवसांनी म्हणजेच प्रतिपदेला भेटायला येणार असल्याचे सांगितले व तेंव्हापासून दरवर्षी बलिप्रदेपासून शेणाचा गायवाडा साकारुन ‘ईडा-पिडा टळू दे’, ‘बळीचे राज्य येवू दे’ चा जप करत बहीण भावाला औक्षण करतात. ‘बळीराजा’च्या स्वप्नातलं स्वराज्य यावं, असे मनोमन चिंतते. काळ्या रानात राबराब राबणारे कष्टकरी माय-बाप, भाऊ भावजाई हेच तीच्यासाठी भगवंत असतात. गायवाड्यात शेणापासून गाईचा गोठा, गाई,म्हशी व त्यांची वासरे, पाच पांडव, पारंपारीक पद्धतीतील संसारोपयोगी वस्तूंसह एकत्र कुटुंब पद्धतीतील महिला,पुरुष सदस्य करीत असलेली विविध कामे,गायवाड्याच्या वेशी शेणाने काढून वेशीचे रक्षण करणारा यसकर घालून सुख व संपन्नतेचे दृश्य साकारल्यानंतर त्यांची हळदीकुंकवाने मनोभावे पूजा केली जाते. शेणाच्या गोवऱ्याचा जाळ करून त्यावर कुंभाराने घडवलेले मडके ठेवून त्याच ठिकाणी शेवया शिजवून त्याची खीर केली जाते.दूध, तुप व साखर टाकून बनविण्यात आलेल्या खिरीचा नैवेद्य दाखविला जातो. मडक्यात शिजवलेल्या या शेवयांच्या खिरीचा प्रसाद वाटला जातो. त्याची चव अवर्णनीय असते. शहरी झगमगाटात व विकत आणलेल्या रेडीमेड मिठाईच्या युगात मात्र अस्सल ग्रामीण दिवाळ सणाची मजा आजही खेडोपाडी पाहावयास मिळते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close