ब्रेस्ट व सर्वाइकल कॅन्सरबाबत महिलांनी जागरूक राहावे डॉ. मंजुषा तगडपलेवार : महिला दिनानिमित्त मार्गदर्शन शिबिर!
महिला दिनानिमित्त मार्गदर्शन शिबिरात उपस्थित मान्यवर महिला!

पुसद : महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वाइकल कॅन्सरचे प्रमाण वाढत असल्याने या आजारांविषयी वेळेवर जागरूकता निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मंजुषा तगडपलेवार यांनी केले.आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पुसदमधील गांधी नगरात योगसाधना झुंबा वर्गातर्फे आयोजित मार्गदर्शन शिबिरात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शीला देशमुख होत्या, तर माजी नगराध्यक्ष डॉ. माधवी गुल्हाने यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. तगडपलेवार यांनी महिलांशी संवाद साधताना ब्रेस्ट कॅन्सर व सर्वाइकल कॅन्सर या आजारांविषयी सविस्तर माहिती दिली. अनेकदा योग्य माहितीचा अभाव आणि नियमित तपासणी न झाल्यामुळे आजाराचे निदान उशिरा होते, असे त्या म्हणाल्या. महिलांनी वर्षातून किमान एकदा आरोग्य तपासणी करून घ्यावी, तसेच शरीरात आढळणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. वेळेवर निदान झाल्यास कॅन्सरवर प्रभावी उपचार शक्य होतात, असे त्यांनी स्पष्ट केले.सुदृढ आरोग्यासाठी नियमित योगा, व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले .यावेळी बोलताना डॉ. माधवी गुल्हाने यांनी स्त्रीशक्तीची महती सांगितली. स्त्री ही कुटुंबाचा कणा असून तिचे आरोग्य सुदृढ राहणे समाजाच्या आरोग्यासाठीही महत्त्वाचे आहे, असे सांगत महिलांनी स्वतःवर प्रेम करावे, आत्मविश्वासाने आणि स्वाभिमानाने जीवन जगावे, असा संदेश त्यांनी दिला. दैनंदिन जीवनात योगा व व्यायामाचा समावेश केल्यास शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त राहते, असे त्या म्हणाल्या. अध्यक्षीय भाषणात शीला देशमुख यांनी महिलांच्या आरोग्यासाठी योग्य आहाराचे महत्त्व अधोरेखित केले. संतुलित व पौष्टिक आहारामुळे शरीर सशक्त राहते आणि विविध आजारांपासून संरक्षण मिळते, असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून महिला शक्तीला अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक साधना ठाकरे यांनी केले. सूत्रसंचालन वैशाली ठाकरे यांनी केले तर सोनाली शिरभाते यांनी आभार मानले. या उपक्रमासाठी मंदा पानेकर, अंजली पाटील, कल्पना सोळंके, विजया इंगळे, देवश्री राठोड, रेश्मा खुळे, संध्या शिंगणजुडे, राखी देशमुख, आस्मा मिर्झा यांनी पुढाकार घेतला.



