अंतरिक्षातून सौर ऊर्जा, एक यशस्वी प्रयोग -प्रा. सुधीर पाठक; देवराव पाटील चोंढीकर स्मृती व्याख्यान पुष्प!

पुसद:पारंपारिक ऊर्जेसोबतच अलीकडच्या काळात अपारंपारिक ऊर्जा झपाट्याने उपलब्ध होऊ लागली आहे. पारंपारिक विद्युतनि र्मितीने जगाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता संपूर्ण मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण होणे शक्य नाही. ही जागतिक उणीव लक्षात घेऊन अमेरिके पाठोपाठ इतर देशांमध्येही अंतरिक्षातून सरळ सौर ऊर्जा प्राप्त करण्याचे नव्याने प्रयोग सुरू झाले आहेत.
ते यशस्वी ही झाले आहेत. त्यामुळे २०५० पर्यंत मानवाच्या मूलभूत गरजा १००% पूर्ण होतील असा आशावाद ओजस्वी वक्ते प्रा. सुधीर पाठक यांनी पुसद येथे व्यक्त केला. श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद व विदर्भ साहित्य संघ शाखेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकनेते देवराव पाटील चोंढीकर यांच्या स्मृती व्याख्यान पुष्पात ते बोलत होते.
३० नोव्हेंबर रोजी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या देवराव पाटील चोंढीकर सभागृहात सदर व्याख्यान पुष्प पार पडले. *सौर ऊर्जा एक नवाय प्रयोग* हा व्याख्यानाचा विषय होता. याप्रसंगी विचार पिठावर माजी मंत्री डॉ. एन.पी. हिराणी, प्रमुख वक्ते प्रा. सुधीर पाठक, माजी आमदार विजयराव पाटील चोंढीकर, दीपक आसेगावकर, प्राचार्य डाॅ.उत्तम रुद्रवार उपस्थित होते. मान्यवराच्या हस्ते सर्वप्रथम देवी सरस्वती, छत्रपती शिवाजी महाराज, लोकनेते देवराव पाटील चोंढीकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद चे अध्यक्ष अनिरुद्ध विजयराव पाटील चोंढीकर यांच्या हस्ते प्रमुख वक्ते प्रा. सुधीर पाठक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सोबतच विदर्भ साहित्य संघाच्या वतीने दीपक आसेगावकर यांनी सुद्धा प्रमुख वक्त्याचे स्वागत केले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना व दिवंगत लोकनेते देवराव पाटील चोंढीकर यांना नमन करून ते आपल्या एका तासाच्या दृकश्राव्य माध्यमाच्या साह्याने ओजस्वी उद्बोधनात पुढे म्हणाले की, मानव अस्तित्वात आल्यापासून पारंपारिक साधने उदाहरणार्थ लाकूड, टाकाऊ कचरा, कोळसा, दगडी कोळसा, खनिज तेल, पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक वायू यापासून विद्युत ऊर्जा मिळविण्यात येत होती.
परंतु दिवसेंदिवस वाढत चाललेल्या लोकसंख्येमुळे ती मूलभूत गरज पूर्ण करू शकत नव्हती, वाढत्या लोकसंख्येमुळे उपलब्ध साधनांच्या कमतरतेतून सौरऊर्जेचा जन्म झाला. याला पर्याय म्हणून २४ तास प्रकाशाच्या साह्याने सॅटॅलाइट द्वारा सौर ऊर्जा प्राप्त करण्याचा नवीन प्रयोग विकसित करण्यात शास्त्रज्ञांनी यश मिळवले. त्याचीच परिणीती म्हणून अंतरिक्षातून सरळ सौर ऊर्जा प्राप्त करणारा प्रयोग अखेर यशस्वी झाला आहे. यामुळे आठपट सौर विद्युत चा वापर शक्य होईल व सौरऊर्जेची अपारंपारिक पद्धत प्रदूषण मुक्त करण्याची गरज पूर्ण होईल, असे शेवटी प्रा. सुधीर पाठक म्हणाले. व्याख्यान पुष्पाचे सूत्रसंचालन प्रा., गजानन जाधव प्रास्ताविक डॉ. उत्तम रुद्रवार यांनी तर आभार प्रज्ञा गडदे यांनी मानले. सदर व्याख्यान पुष्पास पुष्पावंती परिसरातील गणमान्य मान्यवर, पत्रकार व रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



