सगेसोयरे कायद्यासाठी पुसद येथे सकल मराठा समाजाच्या वतीने ‘रास्ता रोको’ आंदोलन!

पुसद :राज्य सरकारने मराठा समाजाला विशेष अधिवेशन घेऊन १० टक्के आरक्षण घोषित केले आहे. मात्र मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना हे आरक्षण मान्य नसून त्यांनी पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे. तसेच सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करावे, अशी मागणी त्यांनी सरकारकडे लावून धरली आहे. याच मागणीसाठी पुसद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवार २४ रोजी ११ ते १ यावेळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.
सगे-सोयरे या संबंधात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार शासनाने कायदा पारीत न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा चक्का जाम आंदोलनातून देण्यात आला आहे.सकल मराठा समाजातील पुसद परिसरातील समाज बांधव दि.२४ जानेवारी रोजी शिवाजी चौक पुसद येथे रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते. मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र शासनाकडे मराठा समाजाच्या कुणबी जात प्रमाणपत्र संदर्भात केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्र शासनाने त्या मागणीस प्रतिसाद देवून सगे सोयरे यांना सुध्दा कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबतचा जी.आर. काढला. परंतु त्याबाबत जोपर्यंत शासन कायदा करीत नाही तो पर्यंत वेगवेगळ्या स्वरुपात आंदोलन करण्याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी समाज बांधवांना आव्हान केले आहे.मनोज जरांगे यांनी केलेल्या आव्हानास प्रतिसाद म्हणून दि. २४ फेब्रुवारी २०२४ रोजी शिवाजी चौक पुसद येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. मराठा समाजाची सगे-सोयरे संदर्भातील कायदा करण्याबाबतची मागणी शासनाने लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मराठा समाजाची भावना शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.शासनाने मराठा समाजाची रास्त असलेल्या मागणी तात्काळ दखल घेवून ती करण्यात यावी. मागणी पूर्ण न केल्यास आम्ही यापुढे तीव्र स्वरुपाचे आंदोलन उभारू असा इशारा मागणी निवेदनात देण्यात आला आहे.आंदोलन स्थळी निवेदन स्वीकारण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी म्हणून निवासी तहसीलदार कदम उपस्थित होते.मराठा समाजाचे वतीने शरद मैन्द, अनिरुद्ध पाटील , सुधाकर ठाकरे,नितीन पवार, प्रभाकर टेटर, शिवाजीराव कदम विजय बाबर आदी मान्यवरांनी निवेदनार स्वाक्षरी केलेले निवेदन मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.