पुसद तालुक्यात पुन्हा लम्पि आजाराचा शिरकाव

पुसद :तालुक्यातील शेंबाळपिंपरी पशुवैद्यकीय केंद्रांतर्गत येणाऱ्या देवगव्हाण येथे पुन्हा जनावरांवर लम्पि आजाराचे आक्रमण झाले असून या जीवघेण्या आजाराच्या विळख्यात अनेक जनावरे आली असून एका जनावराचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.यामुळे तालुक्यातील पशुपालकांमध्ये एकच खळबळ उडाली असून देवगव्हाण परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. गतवर्षी सुद्धा परिसरातील जनावरांना या जीवघेण्या आजारानेग्रासले होते. त्यावेळी पशुवैद्यकीय चमुने लसीकरण आणि उपचाराने हा आजार आटोक्यात आणला होता.संतोष काळे नामक शेतकऱ्याच्या जनावराचा या आजाराने मृत्यू झाला तसेच पशुवैद्यकीय दवाखान्यात या आजारावरील लस अजून उपलब्ध नसल्याची बाबही समोर आली आहे. तर पावसाळ्यात पाळीव जनावरांवर विविध आजारांचे संक्रमण होत असते याकडेही गांभीर्याने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.यातच पुसद शहरातील पशुवैद्यकीय अधिकारी वेळेवर दवाखान्यात हजर राहात नसल्याने अनेक पशुपालकांना आपली जनावरे घेऊन पशुवैद्यकीय दवाखान्यावर सतत चकरा माराव्या लागत असून अनेक पशुपालकांनी याबाबत सदर प्रतिनिधी जवळ संताप व्यक्त केला आहे.चव्हाण नामक पशुवैद्यकीय अधिकारी हा राजकीय वरदहस्ताने पुसद येथे कार्यरत असून नेहमीच ड्युटीवर नसतोच तसेच त्यांच्या मोबाईल ही सतत बंदच असतो.अशा कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांनी त्वरित कारवाई करावी अन्यथा आंदोलन करावे लागेल असे अनेक पशुपालकांनी सदर प्रतिनिधी जवळ सांगितले.