पुसद शहरात छत्रपती शिवरायांच्या ३९५ व्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी !
विविध मान्यवरांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना, विविध झाँकी व देखाव्यांचे उत्कृष्ट सादरीकरण

पुसद:शहर आणि परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी ८.३० वाजता शिवपुजन व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीचे संयोजक व पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या नेतृत्वाखाली या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात पुसदच्या शिवपर्व २०२५ या कार्यक्रमाचा आढावा घेतला. ते म्हणाले की, पुसद शहरात दरवर्षी शिवजन्मोत्सव साजरा केला जातो. डिजे विरहित शोभायात्रा काढण्यात येते. दरवर्षी शिवसामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित केली जाते. यावर्षी १६ हजार विद्यार्थी शिवसामान्य ज्ञान स्पर्धेत सहभागी झाले होते असे शरद मैंद यांनी सांगितले.
सुरुवातीला ना. इंद्रनील नाईक, खा. संजय देशमुख, माजी आ. निलय नाईक, माजी आ. विजय पाटील चोंढीकर, अॅड. माधवराव माने, शरद मैंद, अॅड. आशिष देशमुख, वियजराव चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी हर्षवर्धन बिजे, अनिरुद्ध पाटील, महादेव सुपारे, अनुकूल चव्हाण, दिगंबर जगताप, विजय जाधव, अॅड. आदित्य माने, नितीन पवार यांनी शिवपूजन केले. याप्रसंगी प्रशासकीय, राजकीय, सामजिक, शैक्षणिक, व्यापारी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी-जय शिवाजी या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.अनेक शिवप्रेमींनी पुष्प अर्पण करून शिवरायांना वंदन केले. प्रास्ताविक शिव महोत्सवाचे प्रमुख शरद मैंद यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष अनंतवार यांनी केले. दुपारी २ वाजता शहरातील मुख्य मार्गाने शोभायात्रेला सुरुवात झाली. शोभायात्रेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी अग्रस्थानी होती. बेंबळा येथील राज्यस्तरीय प्राप्त भजनी मंडळाने उत्कृष्ट सादरीकरण करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
घोड्यावर स्वार छत्रपती शिवाजी महाराज व मावळे शोभायात्रेचे आकर्षण ठरले. केरळ येथील सुप्रसिध्द बँड पथकाने कत्थक नृत्य सादर केले. दर्यापूर येथील पथकाने चित्तथरारक कसरती सादर करुन अंगावर शहारा आणला. तर उदासी मंडळ, दुर्गा वाहिनी पथकाही शोभायात्रेत सहभागी झाले होते.
राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी शोभायात्रेचे आकर्षण होते. तसेच युवा जल्लोष व रामराज्य ढोल पथकाने ढोलताशांचे सादरीकरण करत महाराष्ट्राची परंपरा कायम ठेवली. खामगांव येथील श्री तानाजी मल्लखांब पथकाने मल्लखांबाचे सादरीकरण करुन उपस्थितांमध्ये रोमांच निर्माण केला. राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त ढेमसा आदिवासी नृत्य, बंजारा लोकनृत्य शोभायात्रेचे विशेष आकर्षण ठरले. शोभायात्रेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मुव्हिंग मुर्तीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. सदर शोभायात्रेमध्ये महात्मा मुंगसाजी विद्यालय पुसद, विद्यालंकार्स पोदार लर्न स्कुल पुसद, बचपन इंग्लीश मिडीयम स्कुल पुसद, श्री शिवाजी विद्यालय पुसद, कोषटवार दौलतखान विद्यालय, पुसद, मातोश्री विद्यालय श्रीरामपुर पुसद, ज्योर्तिगमय इंग्लीश मिडीयम स्कुल पुसद, नवजीवन ज्ञानपीठ इंग्लीश मिडीयम स्कुल पुसद व गुणवंतराव देशमुख उच्च माध्यमिक शाळा श्रीरामपुर यांनी शिवकालीन देखावे सादर केले. सदर शोभायात्रा श्री शिवाजी विद्यालय पुसद पासुन प्रारंभ होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, नगीना चौक, चंद्रशेखर आझाद चौक, म. गांधी चौक मार्गे निघुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये रॅलीचा समारोप करण्यात आला. या शोभायात्रेत मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.



