राजकिय

पुसद मतदारसंघात कोण कोणाचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करतंय.? ययाती नाईक यांच्या भाजप पक्षप्रवेशाने “दिल्ली ते गल्ली” रंगली चर्चा!

घरात फुट पडल्याने राज्यमंत्री ॲड.इंद्रनिल नाईक यांनी धक्का..

पुसद: मतदारसंघाने राज्याला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या आणि यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व असलेल्या नाईक घराण्यात पुन्हा मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचे सख्खे मोठे भाऊ ययाती नाईक यांनी भाजपाचा झेंडा हाती धरला दिल्लीत एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापूर्वीच पुसद परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हं दिसुन येत असल्याची चर्चा असून या पक्षप्रवेशामुळे भाजपसाठी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची चर्चा पुसद भाजपमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे.

 ही बातमी थेट ” दिल्ली ते गल्ली” प्रयंत्न मतदारसंघात वाऱ्यासारखी पसरली.ययाती नाईक हे बंगल्याच्या झोपडीतून थेट दिल्लीत पोहोचल्याने त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना धक्का बसल्याची चर्चा अनेक राजकीय विश्लेषकांकडुन व्यक्त केली जात आहे. ययाती नाईक यांच्यासारखा मोठा राजकीय वारसा असलेला तरुण नेता भाजपमध्ये आल्याने महाराष्ट्रात पक्ष संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे. ययाती नाईकांच्या प्रवेशामुळे आगामी काळात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय दूरगामी परिणाम मतदार संघाच्या राजकारणावर होण्याची चिन्हे आहेत.राजकारण हे केवळ सत्तेचा खेळ नसून, जनतेच्या आकांक्षा, भावना आणि अपेक्षांचे प्रतिबिंब आहे. या गुंतागुंतीच्या मैदानात यशस्वी होण्यासाठी रणनीती, नियोजन आणि तंत्रज्ञानाचा अचूक मेळ आवश्यक आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशाच्या बातमीमुळे पुसद मतदारसंघात कोण कोणाचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करतंय.? याची “दिल्ली ते गल्ली”राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

 

पुसद मतदारसंघासह जिल्ह्यात एकेकाळी नाईक घराण्याचा दबदबा होता. वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक हे काका-पुतणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर सुधाकर नाईक यांचे बंधू मनोहर नाईक हेही अनेक वर्षे मंत्रिमंडळात होते. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर नाईक यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.त्यावेळी सुधाकरराव नाईक विजयी झाले. त्यांच्या निधाना नंतर मनोहरराव नाईक आमदार आणि मंत्री झाले. आता नवी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. सुधाकरराव नाई यांचे बंधू मधुकरराव नाईक यांचे चिरंजीव ॲड. नीलय नाईक हे काकांना विरोध करुन यापूर्वीच भाजपात जावुन ते विधान परिषद सदस्य आमदार झाले होते.नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत इंद्रनील आणि ययाती यांच्यात उमेदवारीसाठी मतभेद होऊन स्पर्धा निर्माण झाली होती. अजित पवार यांनी इंद्रनील नाईक यांना पसंती दिली. कुटुंबीयांनीही इंद्रनील नाईक यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे ययाती नाईक यांना कुटुंबाकडूनच वारंवार डावलल्याने ते नाराज होते. त्यांना स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी बंडखोरीची तयारी केली होती. मात्र सर्वांनी त्यांची समजूत काढली.शेवटी ययाती नाईक यांना पुसद सोडून कारंजा येथून  निवडणूक लढविली होती. यातही ते अपयशी ठरले. परंतु इकडे महायुतीची सत्ता आल्यानंतर इंद्रनील नाईक मंत्री झाले.व तेव्हापासूनच भाजप ययाती नाईक यांच्या संपर्कात असल्याची खात्रीशीर चर्चा होती. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर डोळा ठेवून भाजपने ययाती नाईक यांच्या पक्षप्रवेश घडून आणला असावा असा कयास राजकीय विश्लेषण लावला जात आहे.महाराष्ट्राचे राज्याचे माजी मुख्यमंत्री, स्व. वसंतरावजी नाईक यांचे नातू आहेत तर माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकराव नाईक यांचे पुतणे असून माजी मंत्री मनोहराव नाईक यांचे जेष्ठ चिरंजीव राज्यमंत्री इंद्रनील नाईक, यांचे ते जेष्ठबंधू असून ययाती नाईक यांनी मंगळवारी राजधानी दिल्लीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यालयात एका छोट्याखानी कार्यक्रमात डॉ. सवेंद्रसिंह ठाकुर राष्ट्रीय कार्यालय अधीक्षक भारतीय जनता पार्टी, अरविंद मेमन (राष्ट्रीय सचिव भारतीय जनता पार्टी), सुधांशू त्रिवेदी (राज्यसभा सदस्य) यांची प्रामुख्याने उपस्थितीत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश केला.

 

पण या पक्षप्रवेशाचा भाजपला मोठा फायदा होईल अशी अपेक्षा पक्षाला जरी असली तरीही भारतीय जनता पक्षातील जुने पदाधिकारी कार्यकर्ते ययाती नाईक यांना किती पसंती देतील हे मात्र संशोधनाचा विषय आहे.ययाती नाईक यांना घेऊन भाजपने जातीय समीकरण साधल्याचे दिसून येते. या भागात बंजारा समाजासह अनुसूचित जाती जमाती समाजाची लोकसंख्या मोठी असली तरीही मराठा कुणबी मुस्लिम समाजाच्या मतदानाचाही टक्का आहे.बंजारा व आदिवासी समाजांच्या मतांवर भाजपचा डोळा असला तरीही हे दोन्ही समाज एकत्र येथील की नाही ही मोठा यक्षप्रश्न आहे. तर शहरातील मुस्लिम समाज कोणत्या नेत्यावर भरोसा करेल याचीही मतदारसंघात चर्चा आहे.त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठा फायदा कोणत्या पक्षाला कोणत्या नेत्याला होईल असे गणित मांडले जात आसले तरीही मतदारसंघात टाचणी पडली तरी मोठा आवाज येतो हे विशेष.. मागील काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका लवकरच होणार असल्याचे संकेत आहेत त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहेत. स्थानिक पातळीवरील राजकीय क्षेत्रात “नाव” असलेल्या पदाधिकाऱ्यांनी सोयीचं राजकारण करण्यासाठी स्वार्था सोबतच परमार्थ साधुन राजकीय जम बसवण्यासाठी कोलाटऊड्या घेतानाचे हे चित्र दिसून येत आहेत.

राज्यमंत्री इंद्रनील नाईक व माजी विधान परिषदे सदस्य मॲड.निलय नाईक तसेच ययाती नाईक हे भाऊ म्हणून व महायुतीतील पक्षातील एकत्र घटक असले तरी यांचं राजकीय वैर सर्वश्रुत आहे यांच फारसं जुळतंच असं नाही.त्यामुळे या मतदारसंघात कोण कोणाचा करेक्ट कार्यक्रम करतंय.? हे मात्र येणारा काळच ठरवेल पण आता पक्षवाढिच्या निमित्ताने मतदारसंघात राजकीय कूरघोडी सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण मागच्या वर्षी दि.१५ ऑगस्ट २०२४रोजी स्वातंत्र्यदिनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की,१लाख कुटुंबातील तरुणांना आम्ही पुढे आणू इच्छितो ज्यांचा राजकीय घराण्यांशी कोणताही संबंध नाही. ज्यांचे आई, वडील, भाऊ, बहीण, काका, मामा असे कोणीही राजकारणात नाही. मग ते पंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद अशा विविध माध्यमातून राजकारणात येऊ इच्छितात जेणेकरून राजकीय घराणे शाहीपासून, जातीयवादापासून मुक्ती मिळू शकेल व लोकशाही बळकट होऊल असं वक्तव्य केलं होतं.पंरतु “भाजपचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत,” राजकारणातील घराणेशाहीला विरोध करणारं हे त्यांचं पहिलंच विधान नाही. आतापर्यंत नरेंद्र मोदी, अमित शहा, अशा भाजपच्या सर्वोच्च नेत्यांनी वारंवार राजकारणातील घराणेशाहीला भाजप प्रोत्साहन देत नसल्याबाबत भूमिका मांडली होत्या परंतु भाजप अशा अनेकांना घराणेशाहीतील नेत्यांनाच पक्षप्रवेश देवुन पुन्हा घराणेशाहीला संधी व पाठबळ देत असल्याचे चित्र दिसुत येत आहे.त्यामुळे भाजपसाठी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा जुन्या नव्या पुसद भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून आरोप केला जात आहे.‘घर फिरले की घराचे वासेही फिरतात’ अशी गत भाजपमधील काही निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची झाली आहे. सत्ता असुनही त्यांचे फळे नेहमी भाजपच्या विरोधात असणारे चाखत असल्याने नाराजी व्यक्त करत आहेत परंतु ययाती नाईक यांचा हे पक्षप्रवेश कुणाच्या पथ्यावर पडेल या बाबत राजकीय चर्चा मतदारसंघातील शहरात व गाव तांड्यावर चौका चौकात रंगु लागल्या आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close