ईतर

पाणीटंचाईची चुकवू वाट ; जलसंधारणातून उगवू समृद्धीची पहाट ..

जलसंधारण दिन विशेष....

पुसद :गेल्या ७३ वर्षांपासून पुसद विधानसभा मतदारसंघावर नाईक कुटुंबीयांचं एकहाती सत्ता आहे. या मतदारसंघातून नाईक कुटुंबातील सदस्यच आजपर्यंत आमदार झाले आहेत. महाराष्ट्राची स्थापना होण्याच्या आधीपासून ते आतापर्यंत म्हणजे २०२५ पर्यंत एका घराण्यातील आमदार देणारा हा मतदारसंघ आहे. या कुटुंबानं महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले आहेत. सुधाकररावजी नाईक यांचे काका वसंतरावजी नाईक हे सलग ११ वर्षे मुख्यमंत्रिपदावर होते. त्यानंतर सुधाकरराव यांनीही मुख्यमंत्रिपद भूषवलं. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पुसद मतदारसंघातून इंद्रनील नाईक हे भरघोस मतदानाने निवडून आले आहेत. ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. त्यांना आठ खात्याचे राज्यमंत्रिपद मिळालं आहे.सुधाकरराव नाईक हे काका वसंतराव नाईक यांच्याप्रमाणेच दूरदृष्टी असलेले राजकीय नेते होते. त्यांनी राज्यात जलक्रांतीचे स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. त्यातूनच ते मुख्यमंत्री असताना जलसंधारण विभागाची स्थापना झाली. जलसंधारण मंत्रालयाच्या माध्यमातून त्यांनी ‘पाणी अडवा – पाणी जिरवा’ ही शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरलेली योजना सुरू केली होती. शेतकऱ्यांच्या घरी समृद्धी नांदावी, या विचारातून त्यांनी ही योजना आणली होती.तीव्र पाणीटंचाईने होरपळलेल्या महाराष्ट्राची तहान भागवण्यासाठी जलसंवर्धनाकडे कोणीही लक्ष दिले नव्हते पण सुधाकरराव नाईक कायम ‘जलसंधारण ही ‘जन चळवळ’ झाली पाहिजे’ असे म्हणायचे. त्यांनी महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हे जलसंधारणासाठी पिंजून काढत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जलसंधारणाच्या बैठकी घेतल्या. जलसंधारण, जलसिंचन प्रश्‍नांची उकल केली. पाऊस आणि नदी पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी जलसंधारण योजना राबविण्याचा प्रयत्न केला यामध्ये तलाव दुरुस्ती, बंधारे बांधणे आणि जल पुनर्भरण यांचा समावेश होता. मात्र हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक व जलक्रांतीचे प्रणेते स्व.सुधाकरराव नाईक यांच्या कर्मभूमीत यंदाच्या उन्हाळ्यात भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ही बाब पुसद मतदारसंघासह शहरासाठी निश्चितच भूषणावह नाही. हे मात्र त्रिवार सत्य आहे.’पाणीटंचाईची वाट चुकवूया आणि जलसंधारणातून समृद्धीची पहाट उगवूया’ , अशी शपथ जलसंधारण दिनाच्या पूर्वसंध्येला पुसद परिसरातील शेतकरी, नागरिकांनी घेतली.यावेळी पुसदचे उपविभागीय महसूल अधिकारी आशिष बिजवल यांच्या पुढाकारातून बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सुधाकर नाईक प्रेक्षागृहात ‘जलसंधारण कार्यशाळा’ शुक्रवार ता. ९ रोजी पार पडली. पाणलोट व्यवस्थापन व त्यातून आलेली जलसमृद्धी , सिंचन समृद्धी देणारा जलतारा प्रकल्प यावरील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने प्रेरित होऊन उपस्थित महसूल, कृषी, वन, मनरेगा, पाटबंधारे विभागातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक, अंगणवाडी सेविका, शेतकरी यांनी तीव्र उन्हाळ्याच्या झळा सोसत जलसंधारण कार्यक्रम राबविण्याचा यावेळी मनोदय जाहीर केला. वालतुर तांबडे येथील येथील संदीप बळीराम राठोड या शेतकऱ्याने गावात एक महिन्यात १०० जलतारा प्रकल्प राबविण्याचा संकल्प करताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत प्रा. गोविंद फुके व  प्रा. दिनकर गुल्हाने सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या कार्यशाळेत पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक सुभाष नानवटे यांनी पाणलोट व्यवस्थापनातून त्यांच्या वायकी दोडकी (जि. वाशिम) या गावात आणलेली जलसमृद्धीची यशकथा मांडली. २०११ ते आजपर्यंतचा त्यांचा पाणी प्रवास उत्कंठावर्धक होता. तत्कालीन तहसीलदार आशिष बिजवल यांच्या मार्गदर्शनात त्यांनी दोडकी गावचा टँकरचा कलंक पुसून काढला. माती नाला बांधातून लोकसहभागातून बाराशे ट्रॅक्टर गाळ उपसून काढला. आणि पहिल्याच पावसात कोरड्याठाक २५ विहिरींना पाणी आले. नंतर सकाळ रिलीफ फंड, पाणी फाउंडेशन, जलयुक्त शिवार, जलतारा यासारख्या जलसंधारण कामातून दोडकी पाणीदार बनली. यावेळी त्यांनी ‘माथा ते पालथा’ही पाणलोट व्यवस्थापनाची शास्त्रीय पद्धत पावर पॉइंट प्रेझेंटेशन मधून सांगितली. यावेळी वाशिम येथील आर्ट ऑफ लिविंगचे डॉ. हरीश बाहेती यांनी जीवन जगण्याची कला सांगत समृद्धी देणाऱ्या पाणी कथा विशद केल्या. नारायण बाबा तलावातील गाळ काढणे त्यासाठी कार्यकर्त्यांचे परिश्रम व नंतर मिळालेला पाणीदार परिसर याबद्दल माहिती देताना मला स्वतःला पाणीदार कसे करता येईल, एकमेकांना आधार पाणीदार बनवूया हे सूत्र सांगत उपयुक्त मार्गदर्शन केले. संपूर्ण महाराष्ट्रात दहा लाख जलतारा प्रकल्पाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून वाशिम जिल्ह्यात एक लाख जलतारा प्रकल्प राबविण्याचा निश्चय केला असल्याचे त्यांनी सांगितले. सुरुवातीला तालुका कृषी अधिकारी विजय मुकाडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपविभागीय जलसंधारण अधिकारी सीमा तायडे, गटविकास अधिकारी अमोल आंदेवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय राठोड उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक नितीन नरवाडे यांनी केले तर अमोल आंदेवाड यांनी आभार मानले.

भूजल पातळीत होणारी घट व ती वाढविण्यासाठी जलसंधारण उपचारांचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. पडणारे पावसाचे पाणी धरले पाहिजे. गावात पडणारे पाणी गावात, शेतातील शेतात, शिवारातील पाणी शिवारात मुरवले पाहिजे. जलसंधारणाचे शाश्वत उपचार केल्यानंतर ते पुन्हा सर्विसिंग करून कार्यान्वित केले पाहिजे. पावसाचे पाणी काचेसारखे असते. ते शेतात पडल्यानंतर गढुळ होते. याद्वारे सुपिक मातीचा ऱ्हास होतो. त्यासाठी जलसंधारण उपचार आवश्यक आहे.      – सुभाष नानवटे

,विभागीय समन्वयक पाणी फाउंडेशन

पाणीटंचाईची परिस्थिती बिकट आहे. वेळीच जलसंधारणाचे उपचार केले नाही तर ती अधिक बिघडू शकते. कार्यशाळेतून जलसंधारणाची दिशा मिळाली आहे. आता प्रत्येक गावात प्रशासन व लोकप्रतिनिधी, गावकऱ्यांची स्वतंत्र बैठक घेऊन कमीत कमी खर्चाचा जलतारा प्रकल्प व विहिर पुनर्भरण यासाठी उत्साहाने काम करण्यात येईल. नागरिकांनी या कामी पुढाकार घेतला पाहिजे. जलसमृद्धी म्हणजे जीवन समृद्धी होय, हे तत्व पाळणे म्हणजेच सुधाकररावजी नाईक यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

 – आशिष बिजवल

उपविभागीय अधिकारी पुसद,

पुसद तालुक्यात पोकरा योजनेअंतर्गत ६१ गावांची निवड झाली आहे. सर्व कृषी योजना एकाच ठिकाणी शेतकऱ्यांना लाभदायी ठरणार आहे. सूक्ष्म स्तर नियोजनात शेतकऱ्यांनी सहकार्य करावे व या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घ्यावा. या गावातून पुढे जलसमृद्धी कायमस्वरूपी मिळू शकेल. 

– अक्षय गोसावी 

उपविभागीय कृषी अधिकारी, पुसद ,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close