लोकहित कनिष्ठ महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्रा प्रकाश लामणे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न!
कर्मचाऱ्यांना ग्रामगीता ग्रंथाचे वितरण

पुसद :स्थानिक मागासवर्गीय लोकहित शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा संचालित लोकहित विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्रा प्रकाश लामणे हे नियत वयोमानानुसार ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले, त्यांना तब्बल ३१ वर्षांचा सेवाकाळ लाभला, त्यानिमित्त महाविद्यालयाच्यावतीने त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
अध्यक्षस्थानी प्राचार्य संजीवकुमार वाघमारे होते. यावेळी मंचावर सत्कारमूर्ती प्रा प्रकाश लामणे,
प्रा प्रदीप जाधव, सेवानिवृत्त आयटीआय निदेशक आर जे सरागे आदींची उपस्थिती होती,सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते संस्थेचे जनक, माजी आमदार, दलितमित्र कै अण्णासाहेब खडसे यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आली.याप्रसंगी सेवानिवृत्त प्रा प्रकाश लामणे यांचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष महेश खडसे यांच्यासह एनसीसी ऑफिसर पांडुरंग बुरकुले, दत्ता शिंदे, अभिमन्यू शिंदे, प्रा नीता उके, प्रा प्रीती राऊत आदींनी प्रा प्रकाश लामणे यांच्या शैक्षणिक, सामाजिक, अध्यात्मिक, संघटनात्मक कार्याचा गौरव करून संस्थेच्या प्रगतीमध्ये प्रा लामणे यांच्या योगदानाबाबत कौतुक केले, व त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य संजीवकुमार वाघमारे यांनी प्रा प्रकाश लामणे यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडून दाखवीत अध्यापन कार्यासोबतच त्यांच्या सामाजिक बांधिलकीची प्रशंसा केली.व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्रा प्रकाश लामणे यांनी सत्काराला उत्तर देताना संस्थेने केलेल्या सहकार्याबद्दल संस्थेचे ऋण व्यक्त केले.प्रास्ताविक पांडुरंग बुरकुले यांनी केले,संचालन मोहन चौधरी यांनी तर आभार अभिमन्यू शिंदे यांनी मानले.सर्व कर्मचाऱ्यांना ग्रामगीता ग्रंथाचे वितरणयाप्रसंगी प्रा प्रकाश लामणे यांच्यातर्फे सत्कार सोहळ्याला उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना मानवतेचे महान पुजारी, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित ग्रामगीता ग्रंथाचे वितरण करण्यात आले, यावेळी सर्व कर्मचाऱ्यांचे चेहरे समाधानाने फुलल्याचे पाहायला मिळाले.



