पूस धरण ओव्हरफ्लो; नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा!

पुसद : शहरासाठी जीवनदायी असलेले पूस धरण दि.२५ सप्टेंबर २०२३ रोज सोमवारी दुपारी ओव्हर फ्लो झाले. त्यामुळे शहराचा पाणी प्रश्न निकाली निघाला आहे.
हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या दूरदृष्टीतून ‘वसंतसागर’ पूस प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली होती. या प्रकल्पाची पाणी पातळी ३९८.७८ मीटर असून उपयुक्त पाणीसाठा ९१.२३ दशलक्ष घनमीटर एवढा आहे. सोमवारी हे धरण पूर्ण भरल्यानंतर सांडव्यावरून ओव्हरफ्लो सुरू झाला. हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी हौशी नागरिकांनी गर्दी केली.दोन-तीन दिवसापासून संततधार पाऊस सुरू असल्यामुळे अवघ्या धरणाचा जलसाठा वाढला आहे. यापुर्वी हे धरण अनेक वर्ष ऑगस्ट महिन्यात तुडुंब भरून ओसांडून वाहिले आहे.
परंतु यावर्षी हे धरण सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात ओसांडून वाहू लागल्याने शहराचा पिण्याचा प्रश्न व उन्हाळी पिकांसाठी सिंचनाचा प्रश्न मिटल्याने शेतकरी आणि शहरवासी आनंदित झाले आहेत.
शहर व तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे.त्यामुळे प्रशासनाने नदीकाठावरील चिखली (कॅम्प), वनवार्ला, बान्शी, येरंडा, सावंगी, रंभा, पिंपळगाव (शेलू), कोप्रा (भोजला) आदी गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पूस नदीला पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील नदीकाठावरील नागरिकांनी आपली निवासस्थाने काढून घ्यावीत, जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी, नदीलगतची घरे सूचना मिळताच खाली करावीत, अन्यथा कोणतीही हानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे संबंधित प्रशासनाने यांनी स्पष्ट केले आहे.



