डॉ.मोहम्मद नदीम यांचा महाविकास आघाडी तर्फे पुसद नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल!
महायुतीच्या नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरू चर्चा मात्र वायफळ!

पुसद :नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडी तर्फे डॉ . मोहम्मद नदीम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. डॉ . मोहम्मद नदीम यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत आज आपला उमेदवारी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.याव्यतिरिक्त नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष -२अन्य नामनिर्देशन पत्र दाखल झाले तर नगरसेवक पदासाठी ९ नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहे.
यावेळी महाविकस आघाडीचे नेते शरदभाऊ मैद, माजी आ. डॉ. वाजहत मिर्झा, रंगराव काळे, अनुकूलजी चव्हाण, महाविकास आघाडी समन्व्यक डॉ. अकील मेमन तसेच महाविकास आघाडीच्या सर्व सहकारी पक्षाचे शहराध्यक्ष, तालुका अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज दि. १५ नोव्हेंबर २०२५ रोजी नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडी तर्फे डॉ. मोहम्मद नदिम, सैय्यद समीर से. मुस्ताक, व अहेमद माजीद सलाम हे दोन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे.तर नगर सेवक पदासाठी प्रभाग क्र. १३ – तुंडलायत रेखा मनोज (अपक्ष) प्रभाग क्र. ७ – शेख शाकील शेख मुनाफ (अपक्ष), शेख जफर मिया अजगर मिया (अपक्ष), प्रभाग क्र. १४ – पडणे गोकर्णा उत्तम (अपक्ष), उबाळे जयानंद विजय (वंचित बहुजन आघाडी), व सोनाली अरुण राऊत (अपक्ष), प्रभाग क्र. २ – चव्हाण सुभाष विठ्ठलराव (अपक्ष) व प्रभाग क्र. ९ – अहेमद माजीद सलाम(अपक्ष) इ. उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.आज उमदेवारी अर्ज स्वीकारले असल्याने आता शेवटचे दिवस शिल्लक असल्याने सर्व उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होणार आहे.पुसद नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद हे खुल्या या प्रवर्गासाठी राखीव असल्याने नगराध्यक्ष पदासाठी प्रत्येक राजकीय पक्षातून इच्छुक उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे.इच्छुक उमेदवारांनी समाज माध्यमांवर तसेच शहरात विविध ठिकाणी पोस्टर, बॅनर बाजी करून वातावरण निर्मितीस सुरुवात केली आहे. महायुतीतील सहकारी भाजपमध्ये नवे आणि जुने असा वाद उफाळून येत आहे.शिवसेना (शिंदे गट) तर स्थानिक आमदाराच्या दावणीला बांधला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातून अनेक इच्छुक असले तरीही स्थानिक सत्ताधाऱ्यांनी या नगराध्यक्ष पदावर दावा सांगल्याने या निवडणुकीसाठी आता हळूहळू रंग भरण्यास सुरूवात झाली असून महायुतीमध्ये रसिखेस सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाने आपापल्या परीने मोर्चेबांधणी हाती घेतली आहे. परंतु महायुतीच्या सहकारी पक्षांमध्ये सुरु असलेली चर्चा आता अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र अजूनही नगराध्यक्ष पदाचा गुंता सुटलेला नाही.इच्छुक उमेदवारांच्या पक्षश्रेष्ठीकडे भेटीगाठी वाढल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी फिल्डींग लावली आहे. परंतु महायुतीतील सहकारी पक्षातील नेत्याच्या मॅरेथॉन बैठका सुरू असून चर्चा मात्र वायफळ घडत आहे त्यामुळे इच्छुकाच्या उमेदवारीवर पाणी फिरले जात आहे.निवडणुकीत स्थानिक नेतेमंडळींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अनेक ठिकाणी चुरशीच्या लढतीत होण्याची शक्यता आहे इच्छुक उमेदवार आपले नशीब अजमिवणार आहेत त्यामुळे निवडणूकीची रणधुमाळी महिनाभर रंगणार असून इच्छुक सक्रिय झाले आहेत.



