महायुतीत मिठाचा खडा!नगराध्यक्ष पदावरून घमासान; राज्यमंत्री इंद्रनील नाईक स्वतः पत्नीसाठी नगराध्यक्ष पदासाठी आग्रही

पुसद : शहराच्या राजकारणात सध्या नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रभाग हॉटस्पॉट ठरत आहे. येथे राजकीय घडामोडी वेगवान झाल्या असून महायुतीत मिठाचा खडा पडल्याने वाद निर्माण होण्याचे संकेत आहेत त्यामुळे नाराजीनाट्य रंगण्याची चिन्हे दिसून येत आहेत. अद्याप महायुतीतील जागावाटपाचे गणित नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा तिढा सुटलेला नाही. यामुळे आगामी स्थानिकच्या निवडणुकीच्या आधी हा तिढा सुटणार की निवडणूक स्वबळावर होणार याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.पुसद नगर परिषदेची ही निवडणूक कायमच चर्चेचा विषय ठरली असून येथील राजकीय स्थिती प्रत्येक वेळी वेगळी राजकीय घडामोड घडवणारी असते. वास्तविक, या नगर परीषदेवर वर्षानुवर्षे नाईक कुटुंबाचे वर्चस्व आहे.पंरतु या निवडणुकीत परीस्थिती मात्र वेगळी आहे.वर्षानुवर्ष एकमेकांना विरोध दर्शविणारे आजच्या घडीला महायुतीच्या बंधनात अडकले आहेत त्यामुळे महायुतीतील सहकारी पक्ष नगराध्यक्ष पदाचा दावा सोडण्यास तयार नाहीत या युतीतील प्रत्येक पक्षाला असं वाटु लागले की ही नगर परिषद आमच्याच पक्षाच्या ताब्यात असली पाहिजे त्यामुळे सत्ता मीळविण्यासाठी महायुतीतील सहकारी पक्षात चढाओढ लागली आहे.दरम्यान आता गेली काही वर्षे पालिकेवर प्रशासक राज असल्याने नगर परिषदेचे राजकारणही वेगळ्या वळणावर गेले आहे. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. महायुती म्हणूनच भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढण्याच्या मानसिकतेत दिसून येत नाहीत..गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने या मतदारसंघात अभूतपूर्व यश मिळवत आणि राज्यातही एकहाती सत्तास्थापना झाली होती. त्यानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने सत्ताधाऱ्यांची चांगलीच कसोटी लागणार आहे. महायुतीसाठी या निवडणुकांकडे नवे नेते तयार करण्याची संधी म्हणून पाहिले जात आहे.पंरतु स्थानिक आमदार राज्यमंत्री इंद्रनील नाईक ही संधी महायुतीत सहकारी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून हिरावून घेत असल्याने महायुतीच्या सहकारी भाजप पक्षात कमालीची हलचल माजली असून विधानसभेला केलेल्या मदतीची अशी पावती असेल तर कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या कां असा प्रश्न महायुतीच्या सहकारी पक्षातील भाजप शिवसेना शिंदेंच्या पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला विचारु लागले आहेत. पुसद नगर परिषदेवर राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या कुटुंबाची सत्ता आहे. त्यामुळे ही नगरपरिषद निवडणूक राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. त्या दृष्टीने त्यांनी स्वबळावर सर्व तयारी केली आहे. परंतु महायुतीच्या सहकारी पक्षातील स्थानिक पातळीवर नेत्या सोबत युती संदर्भात चर्चा करण्यात आली त्यावेळी थेट राज्यमंत्र्यांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मागितली भाजपला ही मागणी अडचणीची ठरणारी आहे.भाजपचे निवडणूक प्रभारी माजी आमदार ॲड.निलयभाऊ नाईक यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी इच्छुक उमेदवारा संदर्भात चर्चा करण्यात आली. भाजपने स्वबळावर निवडणूक लढल्यास सर्व प्रभागात उमेदवार उपलब्ध आहेत, असा फीडबॅक यावेळी देण्यात आला असून शहरात भाजप पक्षाचा मोठा मतदार आहे. शिवसेेना शिंंदे पक्षालाही नगराध्यक्ष पदाचे डोहाळे लागले आहे त्यानंतर राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी चर्चेदरम्यान भाजपशी युती करण्यात उत्सुक असल्याचे सांगण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला देण्यात यावी असा प्रस्ताव दिल्याचे सूत्राची माहिती असून मंत्र्यांनी नेहमीप्रमाणे नगराध्यक्ष पद आपल्याच कुटुंबात हवे आहे. त्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे राष्ट्रवादीने दिलेला प्रस्ताव मात्र गैरसोयीचा असल्याने, भाजपने किंवा त्यांच्या समर्थकांनी मात्र त्याबाबत आपली प्रतिक्रिया दिलेली नाही. एकंदरच महायुती फिसकटली तरीही भाजपची साथ मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिवसेना शिंदे या दोन्ही पक्षांना हवी आहे. त्यावर काय निर्णय होतो याची आता सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.



