अतिवृष्टीचे शेतकरी राजावर आसमानी संकट; वालतूर रेल्वे येथील शेतकर्यांच्या तूरीवर मर रोगाचा प्रादूर्भाव!

पुसद: कृषी प्रधान म्हणून मिरविणाऱ्या देशात शेती व्यवसाय नापसंतीला उतरला आहे.‘जीवाची करायची असेल माती, त्यातनेच करावी शेती’, अशी अवस्था शेती व्यवसायाची झाली आहे. शेती व्यवसाय हा आता आतबट्ट्याचा व्यवसाय झाला आहे. निसर्ग पिकू देत नाही आणि शासन पिकलेला विकू देत नाही. त्यामुळे शेतकरी आता अस्मानी व सुलतानी अशा दोन्ही संकटांना तोंड देत नाईलाजाने शेती व्यवसाय करीत आहे. नुकतेच झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे आतोनात नुकसान झाले असतांना आंतरपिक असलेल्या तूरीवर मर रोगाचा प्रादूर्भाव झाल्याने शेतकरी पुन्हा अस्मानी संकटात सापडले आहे.यंदा पाऊसमान चांगले असल्याने सोयाबीन व आंतरपिक असलेले तूर पिक तरारुन वर आल्याने शेतकरी आनंदित होते परंतु गेल्या शनिवारी ते सोमवारी दरम्यान निसर्गाने अवकृपा दाखवल्याने अतिवृष्टी झाली जमिनीत भरपूर ओलावा आल्यामुळे वालतूर रेल्वे शिवारातील सूर्यकांत पाटील,किशोर जामगडे,चंद्रकांत जामगडे, शशिकांत जामगडे व लगतच्या शेतकर्यांनी सोयाबीनमध्ये घेतलेल्या तूर या आंतरपिकावर प्रादूर्भाव होऊन मर रोग आला आहे.अशीच काहीशी परिस्थिती तालुक्यातील शेत शिवारातील शेतकर्यांची असून शेतकरी जैविक औषधांची फवारणी करुन पिक वाचविण्याची धडपड करीत आहेत. परंतु सध्या कृषी विभागाचे अधिकारी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याच्या कामात व्यस्त असून कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या सल्ल्याने शेतकरी फवारणी करीत आहेत.तूरीवर आलेल्या रोगामुळे शेतकरी पुन्हा अस्मानी संकटात सापडला असून कृषी विभागाने गावोगावी जाऊन जनजागरण करण्याची गरज निर्माण झाली आहे.



