पुसद मतदारसंघात नाराज नेत्यांमुळे आमदार इंद्रनील नाईक विरोधी वातावरण!

पुसद : मतदारसंघात इंद्रनील नाईक यांच्यासाठीही यंदाची निवडणूक अटीतटीची असणार आहे.यवतमाळ जिल्ह्यातील पुसद मतदारसंघातील नाईक कुटुंबीयांचे महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान होते. १९५२ पासून पुसद विधानसभा मतदारसंघावर नाईक घराण्याची पकड आहे. माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक व माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक असे दोन मुख्यमंत्री या घराण्याने महाराष्ट्राला दिले आहेत.पुसदचे नाईक घराणे राष्ट्रवादीचे एकनिष्ठ म्हणून नेहमीच ओळखले गेले.शरद पवार दिल्लीत गेल्यानंतर त्यांनी राज्याची सूत्रे सुधाकरराव नाईक यांच्याकडे सोपविली होती.नाईक घराण्याकडे पन्नास वर्षे कॅबिनेट मंत्रिपदही होते. माजी मंत्री मनोहर नाईक हे सुद्धा राष्ट्रवादीचे निष्ठावंत होते. त्यांना पक्षाने मंत्रिमंडळात स्थान दिले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री मनोहर नाईक यांच्या मोठ्या मुलाला (ययाती नाईक) यांना डावलून इंद्रनील नाईक यांना राष्ट्रवादीनी उमेदवारी दिली व ते विजयी झाले.नाईक घराणे आणि शरद पवार यांचे संबंध बघता राष्ट्रवादीत फूट पडल्यावर हे घराणे पवार यांच्यासोबत राहील, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण मनोहरराव नाईक व त्यांचे पुत्र आमदार इंद्रनील नाईक यांनी बंडखोरी करून अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. परंतु इंद्रनील नाईक हे राजकारणात सक्रिय होताच ययाती नाईक यांना वेळोवेळी डावलने सुरू केले त्यामुळे आता ययाती नाईक यांनी सुध्दा बंड पुकारने स्वाभाविक आहे .या नाईक कुटुंबाचा महाराष्ट्रात राजकीय दबदबा असायला पाहिजे होता.पण त्यांच्या घरातच आता तीन वेगवेगळ्या पक्षांचे झेंडे फडफडत आहेत. अॅड. निलय नाईक यांनी भाजपाचे कमळ हाती घेतले असून अॅड. इंद्रनील नाईक यांनी राकाँ अजित पवार गटाचे घड्याळ व ययाती नाईकांनी मी जिथे आहो तिथेच राहणार असे म्हणत तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नाईक परिवाराचे राजकीय विश्वात हसे सुरू आहे.इतकी वर्ष नाईक घराण्याची सत्ता असुन सुद्धा इंद्रनील नाईक यांना अँटीइन्कबन्सीचा देखील सामना करावा लागू शकतो, असे राजकीय विश्लेषक सांगतात.याशिवाय त्यांच्याविरोधात मतदासंघात अँटीइन्कम्बन्सीही दिसून येत आहे. त्याचाही फटका त्यांना बसू शकतो. ज्या घराण्याचे राज्यात ज्यांचे वर्चस्व असायला हवे होते त्यांना आता एका मतदारसंघापुरते मर्यादित राहून आपले घर कसे वाचवावे, याची चिंता पडली आहे. लोकसभा निवडणुकीत ययाती नाईक हे उबाठा गटाचे उमेदवार संजय देशमुख यांच्या विजयासाठी जिवाचे रान करीत असल्याचे दिसून आले तर इंद्रनील नाईक यांनी महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्यासाठी प्रचाराचा धुराळा उडवित फिरताना दिसले परंतु तरीही महायुतीच्या उमेदवार जयश्री पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला तर नाईकांची या मतदारसंघावर मोठी पकड होती. बंगल्यातून सर्व राजकीय सूत्र चालविली जात होते. सहकार असो की जिल्हा परिषद, पंचायत समिती नाईकांचा शब्द तेथे प्रमाण मानला जात होता त्यांचा प्रभाव कधी कमी होत नव्हता निवडणुकीत विरोध करणारे विरोधकही काही दिवसातच नाईकांशी जुळवून घेत होते बंजाराबहुल या मतदारसंघात इतर समाजाचेही मोठे समर्थन समर्थन मिळत होते परंतु आता गेल्या पाच वर्षातील युती आणि आघाड्यातील उलटफेर आमदाराची पळवा पळवी फोडाफोडीचे राजकारण या गोष्टीमुळे राज्यातच नव्हे तर या मतदारसंघात सुद्धा मोठी उलथापालथ झाली असल्याने जे नाईकाचे समर्थक होते ते आज नायकाच्या विरोधात उभे ठाकले आहे. या मतदारसंघातील मुस्लिम समाज आदिवासी समाज दलित समाज बराच दूर गेल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्या उलथापालथ मुळे हा मतदारसंघ महायुती सरकारच्या सहकारी अजित पवार राष्ट्रवादीसाठीच नाहीतर नाईक घराण्यासाठी सुद्धा डेंजर झोन मध्ये असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत असून या विधानसभा निवडणुकीत नाईकांच्या या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याचे संकेत मिळत आहे.त्यामुळे इंद्रनील नाईक यांना यंदाची विधानसभेची वाट सुलभ नाही असेच दिसत आहे.हीच परिस्थिती विधानसभा निवडणुकीत कायम राहिल्यास इंद्रनील नाईक यांची या विधानसभा निवडणुकीत दमछाक होणार हे मात्र नक्की..
विविध मुद्द्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार इंद्रनील नाईक यांची वाट खडतर!
पुसद मतदारसंघात नाईक घराण्याशी जवळीक असलेले अनेक नेते नाराज असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.नाईक घराण्यांतच तीन पक्षाचे झेंडे असल्याचे चित्र आहे.जे नेते नाईक घराण्याशी एकरूप होते ते आज बंडाच्या तयारीत आहेत तर ‘एक मराठा लाख मराठा’ हा मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनही गरम आहे. मुस्लिम समाजही नाराज असून आदिवासी समाजातील बोटावर मोजण्याइतके काही कार्यकर्ते सोडले तर बाकीचा समाज नाईक घराण्यापासून दूर गेला आहे.दलित समाजही नाईक घराण्याची एकरूप असल्याचे चित्र दिसत नाही. एकीकडे सहकार क्षेत्रात नाईक घराण्याची पकड राहिली नसल्याचे चित्र आहे.मागील दोन दिवसात पुसद तालुक्यासह शहरामध्ये अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला होता. अर्धे पुसद जलमय झाले होते. पूस नदीसह परिसरातील सर्व नाले, ओढे दुथडी भरून वाहू लागले.या अतिवृष्टीचा फटका आमदार इंद्रनील नाईक यांच्या बंगल्याला देखील बसला. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांच्या या बंगल्यात पाण्याचे लोट आले असून हॉल मध्ये सुद्धा पाणीच पाणी साचले होते. तर तालुक्यातील अनेक गावात शेतकऱ्यांच्या शेतीचे अतोनात नुकसान झाले असून हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. परंतु आमदाराच्या घरात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या बातमीपेक्षा बंगल्यातील पाण्याच्याच बातम्या जास्त प्रकाशित झाल्या किंवा ते बातम्या प्रकाशित करून घेतल्या हे मात्र संशोधनाचा विषय आहे. शेतकऱ्याला सहानुभूती देण्याऐवजी किंवा आर्थिक मदत करण्याऐवजी या अतिवृष्टीमुळे आमदाराचे घर सुरक्षित नसल्याचे चित्र रंगवल्या गेले आहे. त्यामुळे आमदार इंद्रनील नाईक व त्यांच्या सौभाग्यवती मोहिनी ताई नाईक यांनी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी असे संबंधित प्रशासनाला आदेश जरी दिले असेल तरीही शेतकरी मात्र हैराण असून याआधीचा सुद्धा या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसल्याने या नुकसानीची मदत मिळेल की नाही याची सुद्धा चिंता या शेतकऱ्यांना लागली आहे. त्यामुळे याचेही पडसाद येणाऱ्या निवडणुकीत उमटतील हे मत जाणकाराचे आहे.पुसद तालुक्याच्या उशाला ईसापुर धरण असुन या धरणाचे ८०टक्के पाणी मराठवाड्याला जात आहे गेल्या ४० वर्षापासून माळ पठारावरील ४२ गावांसाठी उपसा सिंचन योजना मंजूर व्हावी यासाठी माळ पठारावरील शेतकरी आंदोलन करून आजही चातकासारखी आतुरतेने वाट पाहत आहे परंतु या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासन प्रशासन व या मतदारसंघातील लोकप्रतिनिधीची उदासीनता दिसून येत असल्याने याचा फटकाही या निवडणुकीत बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीची वाट आमदार इंद्रनील नाईक यांना खडतर असणार आहे.



