पुसद शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील ११ दुकाने आगीत भस्मसात!

पुसद : शहरातील मध्यवर्ती भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील अकरा दुकानांना लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचा माल जळून भस्मसात झाला.१ मार्चच्या सकाळी अंदाजे ३:०० वाजण्याच्या सुमारास शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील ११ दुकाने आगीत धगधगत असल्याचे काही स्थानिकांना लक्षात आल्याने याची तातडीने संबंधित दुकानदारांना माहिती देण्यात आली.
दुकानदारांनी अग्निशामन दलास दुकानांमध्ये आग लागल्याची घटना कळविली. अग्निशामक दलाचे २ अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले.आग आटोक्यात येत नसल्याचे पाहून दिग्रस वरून अग्निशमन दलाचा बंब बोलाविण्यात आले.
पुसद अग्निशामन दलाचे २ बंब आणि दिग्रस अग्निशामक दलाचा १ अशा ३ अग्निशामक पथकाच्या कर्मचाऱ्यांनी जीवावरची कसरत करीत सकाळी ६ वाजेपर्यंत दुकानास लागलेली आग शमविण्यात यश मिळविले.
आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या दुकानांमध्ये ३ किराणा दुकाने, २ हॉटेल, एक सलून सेंटर, पानठेला, वेल्डिंग करण्याचे दुकान, अंडा विक्रीचे दुकान,चिखन सेंटर अशा विविध दुकानाला आगीच्या रौद्ररूपाने आपल्या कचाट्यात घेऊन बे चिराख केले.
या आगीमध्ये अंदाजे ९० लाखापेक्षा जास्त रूपये किंमतीचे मालमत्तेची हानी झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अमित अरुण धुमाळे किराणा दुकानदार यांनी पोलीस स्टेशन पुसद शहर येथे घडलेल्या घटनेबाबत तक्रार केली आहे.त्यानी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मधील दुकानात आग कशामुळे लागली हे मात्र गुलदस्त्यात आहे. पुसद शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पवार तपास करीत आहे.



