पुसद विधानसभा निवडणुकीसाठी सरासरी ६५ टक्के मतदानाचा अंदाज;मतदानादरम्यान कुठेही अनुचित घटना घडल्याचा प्रकार नाही!

पुसद:पंधराव्या विधानसभा निवडणुकीसाठी आज सरासरी ६५ टक्के मतदानाचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला असून मतदानाची वेळ संध्याकाळी सहा वाजता संपत असली तरी निवडणूक नियमानुसार संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर आलेल्या मतदाराला मतदान करता येते. त्यामुळे संध्याकाळी सहानंतर अनेक मतदान केंद्रात मतदानाची प्रक्रिया सुरु होती. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.
निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ८१-पुसद मतदारसंघात ५७. ७२ टक्के मतदान झाले. ८१- विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याने सर्वपक्षीय १३ दिग्गज उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झाले आहे.मतदानादरम्यान कुठेही अनुचित घटना घडल्याचा प्रकार नाही.८१-पुसद विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत झाली असून महायुतीचे अधिकृत उमेदवार इंद्रनील मनोरराव नाईक महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शरद अप्पाराव मैंद, वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माधव रुक्माजी वैद्य, यांच्यात तिरंगी लढत झाल्याची सर्वत्र चर्चा आहे.ईतर दाह उमेदवारांची पुढीलप्रमाणे नांव आहेत-अश्विन जयस्वाल मनसे, शरद भगत बहुजन समाज पार्टी, डॉ. अर्जुन राठोड जनवादी पार्टी, विशाल जाधव अपक्ष, सुश्रुत चक्करवार निर्भय महाराष्ट्र पक्ष, मारोती भस्के आझाद समाज पार्टी, गोपालकृष्ण जाधव अपक्ष, मजहर खान रहीम खान अपक्ष, मधुकर राजु राठोड अपक्ष व मनिष जाधव शेतकरी संघटना यांचा समावेश आहे. वरील तेराही उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले असुन आता २३ तारखेकडे साऱ्या पुसदकरांचे मतमोजणी निकालाकडे लक्ष लागले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन आशिष बिजवल यांनी काम पाहिले. त्यामुळे या मतदारसंघातील मतदारांनी नेमका कुणाला कौल दिला याची उत्सुकता ताणली गेली असून आता सर्वांना नजरा मतमोजणीच्या निकालाकडे लागल्या आहे.राज्यात कुणाचं सरकार येणार? याची उत्सुकता आता सर्वसामान्यांमध्ये दिसून येत आहे.



