रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे दाखल; जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन

पुसद : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हमरस्त्यावर विमुक्त जाती (अ) प्रवर्गातील बोगस घुसखोरी संबंधाने गुरुवारी गोरसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यात विनापरवानगी आंदोलन करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, भडकाऊ भाषण करणे आदी कारणांवरून आंदोलनाच्या आयोजकासह १६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुसद शहर पोलिस स्टेशनचे कर्मचारी अभिमन्यू चव्हाण ब.नं.४९७यांनी लेखी फिर्याद दाखल केली असून फिर्यादीत म्हटले आहे की, १८ जानेवारी २०२४ रोजी गोरसेनेचे तालुकाध्यक्ष जय राठोड यांनी कोणतीही परवानगी न घेता चक्काजाम आंदोलन केले.
तसेच जिल्हा दंडाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. दुपारी १२ वाजता गोरसेनेचे अध्यक्ष संदेश चव्हाण यांनी रास्ता रोको आंदोलनासाठी अंदाजे साडेतीन हजार लोकांना जमा केले. त्यांनी विनापरवानगी मुख्य रस्त्यावर स्टेज उभारुन नारेबाजी केली. सदर कार्यक्रमात गोरसेनेचे तालुकाध्यक्ष जय राठोड, राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण, जिल्हा अध्यक्ष किशोर चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष उमेश राठोड, जिल्हा सचिव अमोल पवार, प्रा. यशवंत पवार, मोहम्मद मुज्जमील, रा. पुसद, शाकीब शहा, रा. पुसद, अरविंद पवार, रा. हुडी, विश्वास लांडगे, रा. पुसद, डॉ. अनिल भिमा खोला, रा. वाशिम, अर्जुन पवार रा. माहूर, जिल्हा उपाध्यक्ष उमेश खेतावत, तांडा सुधार समितीचे राजू रत्ने, डॉ. राजेश चव्हाण, रा. नांदेड, विजय भिमा चव्हाण रा. जालना यांनी आरक्षणासंदर्भात भडकाऊ भाषणे केली. तसेच बेकायदेशीर जमाव जमविला, वाहतूक अडवून ये-जा करणाऱ्या लोकांच्या अंगावर धावून गेले, विनापरवानगी भाषणे देऊन बंजारा समाजास शासनाविरुद्ध भडकविले. अशा फिर्यादीवरून पोलीस स्टेशनमध्ये अप क्रं.२.२.२४ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. भादंवि कलम १४१, १४३, १४६, १५०, १५३, १५७, १५८, ३४१, ३४९, ३५० सहकलम १३५ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.