कंत्राटदारांचे थकीत देयकासाठी सा.बां.पुसद कार्यालयासमोर लाक्षणिक साखळी उपोषण!

पुसद: सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघटना यवतमाळ जिल्हा ( कल्याण)कंत्राटदार संघटना शाखा पुसदच्या वतीने शासकीय कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ०४,०३,३०५४, या हेडवर देखभाल व दुरुस्तीची कामे केलेली आहेत. मात्र मागील दोन वर्षापासून कमीत कमी पैसे आल्याची माहिती अधिकारी देत असल्यामुळे त्यांची देयके अद्यापपर्यंत दिलेली नाहीत. त्यामुळे मार्च महिन्यात कामाचा पूर्ण निधी उपलब्ध करून देण्यात यावा या मागणीसाठी शासकीय कंत्राटदार संघटनेच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद येथे आज दि.१ मार्च २०२४ रोजी सकाळी ११:००ते५:०० वाजेपर्यंत एक दिवशीय लक्षणीय साखळी उपोषण सुरू केले असून या साखळी उपोषणाची दखल घेवून तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर कळवून निधी उपलब्ध करून न दिल्यास या पुढे आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की,सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत ०४,०३,३०५४, या हेडवरील देखभाल दुरुस्तीचे कामे करण्यात आलेल्या कामाचे मागील दोन वर्षापासून देयक मिळाले नाहीत. ती कामे करताना विविध बँकेकडून व खाजगी लोकांकडून कामासाठी आवश्यक साहित्य खरेदी करणे व मशीन खरेदीसाठी कर्ज घेतलेली आहेत. त्या कर्जाला साधारणतः १टक्का दर महिना व्याज द्यावे लागते. परंतू त्यांची देयके३१ मार्च २०२४ पर्यंत मिळतील असे गृहीत धरून बँक व खाजगी लोकांनी कर्ज दिले. मात्र तिथे एक रुपया अद्याप पर्यंत मिळाला नसल्यामळे घेतलेले कर्ज परतफेड न झाल्यामुळे बँका व खाजगी व्यक्ती वसुलीचा तगादा लावत आहेत.तर त्यामुळे काहीजणांची बँकेतील खाते एनपीएमध्ये जाण्याची शक्यता असून गहाण ठेवलेल्या मालमत्तेवरील जप्तीच्या नोटिसा बँकेकडून काढण्याची शक्यता आहे. काम करण्यासाठी लागणाऱ्या मशनरी (उदा. टिप्पर, रोलर, पेव्हर, व्हॉट मिक्सर प्लॅन्ट, काँक्रीट मिक्सर व अजेक्स आदी)सुद्धा बँकेच्या कर्जावरती घेतलेल्या असून त्यांचा बँकेला महिन्याला हप्ता भरावा लागतो. देयक वेळेवर न मिळाल्यामुळे बँकेचे हप्ते थकलेले असून मशनरी जप्ती होण्याची वेळ आलेली आहे. देयके न मिळाल्यामुळे फंडांच्या अभावामुळे पुढील काम कंत्राटदार करू शकत नाहीत व कर्मचाऱ्यांना विना कामाचे मानधन द्यावे लागत आहे. तसेच काम करणाऱ्या मजुरांवरती उपासमारीची वेळ आलेली असून त्यांना त्यामुळे उचल द्यावी लागत आहे.करण्यात आलेल्या कामामुळे सद्यस्थितीत या हेडखालील कोटींची देयके येणे बाकी असून देयके शासनास सादर केलेले आहेत. ती देयके ३१ मार्च पर्यंत शंभर टक्के देण्यात यावे ज्या कामावर निधी उपलब्ध नाही त्या कामावरील अतिरिक्त सुरक्षा रक्कम परत देण्यात यावी शासनाकडून जो निधी प्राप्त होईल तो निधी प्रत्येक विभागाने प्रत्येक कंत्राकदाराला समान वाटप करावा यवतमाळ जिल्ह्यात जास्तीत जास्त प्रमाणे कंत्राटदार वर्ग असल्याने शासनाने या जिल्ह्याला जास्त निधी वाटप करावा या प्रमुख मागणीसाठी आज महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघटना यवतमाळ जिल्हा ( कल्याण)कंत्राटदार संघटना शाखा पुसदच्या वतीने शासकीय कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम विभाग पुसदच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी संघटनेचे पदाधिकारी राजेश आसेगावकर, अमोल खडके,सय्यद अन्वर अली, पि.के.जाधव, नन्हे भाई, अरुण मनोहर मंगेश पल्लीकोंडावार, कैलास जांगिड,योगेश पांडे,आदींसह सर्व कंत्राटदार या एक दिवसीय लाक्षणिक साखळी उपोषणा सहभागी झाले होते.



