विद्यार्थीनिंनी वृक्षांना व भावांना बांधल्या राख्या!कवडीपूर तांडा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत राबविला उपक्रम!

पुसद : शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच भावांमधील व वृक्षांमधील स्नेह वृद्धिंगत व्हावा या उदात्त हेतूने भोजला केंद्रातील कवडीपूर (तांडा) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थीनिंनी मंगळवारी (ता.२०)वृक्षांना राख्या बांधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला तसेच भावांना राख्या बांधून स्नेह आणि प्रेम व्यक्त केले. रक्षाबंधन म्हणजे प्रेमबंधन, भावाने घेतलेली बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी. भारतीय संस्कृतीत या सणाला विशेष महत्त्व आहे. सद्यस्थितीला पर्यावरणाचा असमतोल बघता वृक्षाचे रक्षण करण्यासाठी कवडीपूर तांडा येथील जि.प. शाळेतील विद्यार्थिनींनी झाडांना व शाळेतील भावांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.
राखी बांधण्याचा अर्थ शिक्षिका करुणा काळे यांनी सांगून ती बांधणार्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे होय असे मत व्यक्त केले.
राखी बांधण्याच्या या सणातून स्नेह व परस्पर प्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली असल्याचे मत शिक्षिका सिमा येरावार यांनी व्यक्त केले. शाळेतील चौथी ते आठवीतील मुलांनी या स्नेहरूप बंधनाचा प्रतीकात्मक रूपाने निसर्गाची बांधिलकी कृतीतून स्वीकारली.
हा उपक्रम शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र तालंगकर यांच्या मार्गदर्शनात शिक्षिका करुणा काळे,सिमा येरावार,शशिकांत जामगडे व सर्व शिक्षक यांनी राबविल्याबद्दल केंद्रप्रमुख विनोद मनवर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अभय पवार,सर्व सदस्य पालक यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील चंचल राठोड,लक्ष्मी राठोड,यश राठोड,चंचल जाधव,परि,लवली,नयन,अनन्या,ज्ञान,अमोली,मिनाक्षी,वीर,दीपक,चांदणी व कॅप्टन मंडळाने पुढाकार घेतला.