देशमुख गुरुजींच्या कर्तुत्वानेच ‘आदर्श शाळा’-सरपंच गजानन टाले
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक यशवंत देशमुख यांना सेवापूर्ती निमित्त गावकर्यांसह मान्यवरांनी दिला भावपूर्ण निरोप

पुसद:शिक्षक फक्त विद्वान असून चालत नाही. त्याच्याकडे मुलांसाठी असलेले आईचे हृदय आणि बापाची प्रामाणिकता असणे आवश्यक आहे. असंख्य बालमनांचे प्रेम, प्रत्येक सहकारी शिक्षक, अधिकारी यांचा स्नेह सोबत घेऊन सेवानिवृत्ती समयी इतकं प्रेम मिळविणारा शिक्षक विरळच.
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक यशवंत देशमुख यांनी कुठलाही मोह न ठेवता, नाव कमावण्याचा अट्टाहास न करता, जीवनातील दुःखावर फुंकर मारत शाळेतील लेकरांमध्ये आनंद शोधत मार्गक्रमण करुन विद्यार्थी,पालक व समाजहिताचे विविध उपक्रम राबवून केलेल्या कार्य कर्तृत्वामुळे जिल्हा परिषद शाळेचा कायापालट करुन बांशी येथील जिल्हा परिषद शाळा ‘आदर्श शाळा’ म्हणून नावारुपास आणल्याचे मत बांशी येथील तरुण व तडफदार सरपंच गजानन टाले यांनी व्यक्त केले.
ते पुसद पंचायत समितीला प्रथम राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळवून देणारे शिक्षक यशवंत देशमुख यांच्या गावकरी व केंद्रातील शिक्षकांनी आयोजित केलेल्या सेवापूर्ती सोहळ्यात अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पुसद पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सुनिता आवटे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसंत लथाड,शंकर गरड,संतोष देशमुख,रामप्रसाद राजने,नितेश तांबारे,अभय ढोकणे,शिवाजी धबडगे,सदाशिव चौधरी,ओमप्रकाश पाटील,बाळासाहेब देशमुख,मयुर देशमुख,देविदास देशमुख,देवराव मळघणे,चोंढी केंद्राचे केंद्रप्रमुख गणेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकारी आवटे यांनी यशवंत देशमुख म्हणजे परिस असून त्यांच्या सानिध्यात आलेल्यांचे सोनं होते असे मत व्यक्त करुन श्री.देशमुख यांनी सेवानिवृत्तीनंतरही शैक्षणिक,सामाजिक,धार्मिक कार्य सुरु ठेवावे असे आवाहन केले.
व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.लथाड यांनी श्री.देशमुख यांनी शाळेला उच्च स्तरावर नेऊन पन्नास हजारांचे बक्षीस मिळवून देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.यावेळी शाळेतील विद्यार्थी सोनू डाखोरे,तुळशी मळघणे,सोनाक्षी गडधने,युवराज लथाड,ओंमकार शेळके यांनी श्री देशमुख यांनी भाऊक होऊन आम्हाला माता—पित्याप्रमाणे संस्कार दिल्याचे गौरोद्गार काढून त्यांना नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले.यावेळी केंद्राच्या वतीने शुद्धोधन कांबळे व परेश सांगानी यांनी तर ज्ञानेश्र्वर इंगोले,गजानन जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.सेवानिवृत्तीनिमित्त श्री.देशमुख,त्यांची पत्नी लता व कन्या पूजालता यांना तुकाराम महाराजांची मूर्ती,शाल,श्रीफळ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना श्री. देशमुख यांनी मिळालेले यश हे आई,वडील,पत्नी,मुली आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांचे असल्याचे उद्गार काढून गहिवरले होते. सेवापूर्ती निमित्त श्री.देशमुख यांनी सर्व विद्यार्थी व मान्यवरांना मिष्ठान्न भोजन दिले.
कार्यक्रमाला सुरेश देशमुख,गजानन देशमुख,गणपतराव देशमुख,भाऊसाहेब चिंचोलकर यांच्यासह गावातील माजी सरपंच, उपसरपंच, व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी,मान्यवर व पालकवर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रल्हाद जाधव यांनी केले. संचालन जया तिडके यांनी तर आभार प्रदर्शन पुंजाजी खंदारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन कदम, भारत राठोड, उल्हास जाधव,सुषमा बुचके, स्वप्निल देशमुख, विद्यार्थी मंडळ व गावकर्यांसह केंद्रातील सर्व शिक्षकांनी पुढाकार घेतला.