मुलांनो,टीव्ही व मोबाईल पासून दूर राहून मैदानी खेळ खेळा-आमदार ॲड.इंद्रनील नाईक

पुसद: शारीरिक,मानसिक, भावनिक व सर्वांगीण गुणवत्ता विकास साधण्यासाठी विद्यार्थ्यांनी टीव्ही, व्हिडिओ गेम,मोबाईल यापासून दूर राहून मैदानी खेळावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असल्याचे मत पुसद विधानसभेचे आमदार ॲड. इंद्रनील नाईक यांनी व्यक्त केले.ते पुसद पंचायत समिती अंतर्गत फुलसिंग नाईक महाविद्यालयाच्या क्रिडांगणावर मंगळवारी(ता.१६) आयोजित तालुकास्तरीय खेळ,कला व क्रीडा स्पर्धेच्या उद् घाटन प्रसंगी उद् घाटक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुसद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय राठोड हे होते. प्रमुख अतिथी म्हणून पोहरादेवी येथील महंत कबीरदास महाराज,ज्ञानदीप अकॅडमीचे संचालक कौस्तुभ धुमाळे, गटशिक्षणाधिकारी सुशीला आवटे,पी एन कॉलेजचे प्राचार्य डॉ. भास्कर पाढेन, प्रा.प्रवीण हमजादे,प्रा. उमेश चव्हाण, प्रा. डॉ. अजय पवार, शिक्षण विस्तार अधिकारी विनायक भांगे, क्रीडा सचिव अमित बोजेवार, विविध केंद्राचे केंद्रप्रमुख, विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारीआदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमस्थळी मान्यवरांचे आगमन होण्यापूर्वी फुलसिंग नाईक यांच्या अर्धाकृती पूतळ्याला मान्यवरांनी माल्यार्पण व पुष्पवृष्टी करुन अभिवादन केले. भाटंबा गाव शाळेतील चिमुकल्यांनी मान्यवरांना डफडी व लेझीमच्या तालात व विविध रंगी फुग्यांची सलामी देत मान्यवरांचे आगळ्या~ वेगळ्या पद्धतीने स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ध्वजाचे रोहन व मशाल प्रज्वल करण्यात आले व राष्ट्रगीताने उद्घाटन करण्यात आले.त्यानंतर ब्राझील नृत्याने रंगारंग कार्यक्रमातून सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.यावेळी वालतूर तांबडे या दूर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थीनी कृष्णाली गव्हाळेने राज्यस्तरीय खो खो संघात मजल मारल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते पदक देऊन सन्मान करण्यात आला.यानंतर बोरनगर व वसंतपूर संघाचा कबड्डीचा प्रेक्षणिय सामना रंगला.त्याला मान्यवरांनी व विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त दाद दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा सचीव अमित बोजेवार यांनी करून तीन दिवसीय तालुकास्तरीय खेळ,कला व क्रीडा महोत्सव आयोजनाची भूमिका विषद केली.तीन दिवसांसाठी यवतमाळ जि.प.प्रा.शिक्षक संघ २३५ शाखा पुसदने सर्वांसाठी आरओच्या पाण्याची मोफत व्यवस्था केली.तर सर्व शिक्षक संघटनांनी माध्यान्ह भोजनाची व्यवस्था केली.सुत्रसंचालन साहेबराव राठोड यांनी केले.उपस्थितांचे आभार प्रकाश टेकाळे यांनी मानले.यशस्वितेसाठी विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी,तालुका क्रीडा समितीतील सदस्य,शिक्षक व विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.